शिवसेनेचे दिवंगत लोकनेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असणारा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर आता ‘धर्मवीर २’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. ‘धर्मवीर २’ हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘धर्मवीर २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या चित्रपटाचे लवकरच चित्रीकरण सुरु होणार आहे. (CM Eknath Shinde On Dharmveer 2)
नुकताच ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचा आज ठाण्यात मुहूर्त संपन्न झाला. पुढील ९ डिसेंबरपासून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार असल्याचं समोर आलं आहे. अभिनेता प्रसाद ओक या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याआधीही चित्रपटाच्या पहिल्या भागात प्रसादने आनंद दिघे यांची भूमिका उत्तम साकारली होती. आजही त्याच्या या भूमिकेचं भरभरून कौतुक करण्यात येत. आता पुन्हा एकदा ‘धर्मवीर २’ या चित्रपटातून प्रसाद ओक पुन्हा एकदा प्रेक्षकांचा मनाचा ताबा घ्यायला सज्ज होणार आहे.
चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी चित्रपटातबाबत एक मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, “’धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बऱ्याच लोकांचे फोन आले. मराठी सिनेमा गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये बघितला गेला. हा चित्रपट हिंदीत बनवा असंही बऱ्याच जणांनी सांगितलं. त्यामुळे भाग २ हिंदीतही आला पाहिजे. भाग १ ला उत्तम प्रतिसाद मिळाला. सगळ्यांनी मेहनत घेतली, त्यासाठी सगळ्यांचे आभार”, असं म्हणत “काही लोकांना सिनेमा खटकला”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
‘धर्मवीर : २ मुक्काम पोष्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपटाचा दुसरा भाग २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ठाणे येथील कोलशेत इथे उभारलेल्या आनंद दिघे यांच्या टेंभी नाका येथील आनंदाश्रमाच्या सेटमध्ये हा मुहूर्त सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माते मंगेश देसाई, प्रसाद ओक, महेश देसाई यांचीही उपस्थिती होती.