स्पष्टव्यक्ती, रोखठोक अभिनेत्री म्हणून मराठी सिनेसृष्टीत हेमांगी कवी हिचं नाव आवर्जून घेतलं जातं. एखाद्या विषयावर स्पष्टपणे भाष्य करण्यास वा सडेतोड उत्तर देण्यास ही अभिनेत्री मागे राहत नाही. त्यामुळे हेमांगी कवी सोशल मीडियावर अधिक चर्चेत असते. सोशल मीडियावरून काही ना काही पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. बरेचदा या अभिनेत्रीला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. मात्र ट्रोलर्सला उत्तर देऊन अनेकदा तिने त्यांची बोलती बंद केलेली पाहायला मिळत आहे. (Hemangi Kavi Answers To Trollers)
सध्या सर्वत्र ‘अॅनिमल’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. तर ‘अॅनिमल’ चित्रपट प्रदर्शनापूर्वी ‘झिम्मा २’ या मराठमोळ्या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. हेमांगीने ‘अॅनिमल’ चित्रपसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे, यांत तिने कॅप्शन देत पाचव्यांदा हा चित्रपट पाहायला जात असल्याचं सांगितलं आहे. यावेळी अभिनेत्रीने या पोस्टला ‘अॅनिमल’ चित्रपटाचं गाणं लावलं होतं. यावरून हेमांगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
‘अॅनिमल’ चित्रपटासाठी पोस्ट शेअर करताच अभिनेत्रीला एका नेटकऱ्याने सवाल केला. मात्र यावेळी हेमांगीने नेटकऱ्याच्या प्रश्नाला अगदी चोख असं उत्तर दिलं आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट करत, “झिम्मा २ किती वेळा पाहिला?” असं विचारत मुद्दाम डिवचलेलं पाहायला मिळालं. मात्र या नेटकऱ्याच्या प्रश्नाला हेमांगीने सडेतोड उत्तर देत, “मी पाहिला तरी, आपण तुलना करण्यातच जाणार आहोत. तरीही मला सांगायला आवडेल सैराट मी सहावेळा पाहिला आहे. कोर्ट तीनवेळा, नदी वाहते तीनवेळा, बापजन्म दोनवेळा, धर्मवीर ४ वेळा आणि हे सगळे चित्रपट चित्रपटगृहात पाहिले. आणि त्याबद्दल वेळोवेळी सोशल मीडियावरून पोस्टही शेअर केल्या. ही तुलना बंद करुन आपलं बॉक्सऑफिस कलेक्शन उत्तम कसं होईल याकडे आपण लक्ष द्यायला हवं” असं म्हटलं आहे.
दरम्यान, हेमांगीच्या या पोस्टवर तिच्या समर्थकांनी तिला पाठिंबा दिला असल्याचं कमेंटमध्ये पाहायला मिळत आहे. हेमांगीची ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.