‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय रिऍलिटी शोने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या रिऍलिटी शोचे केवळ महाराष्ट्रातच नव्हेतर जगभरात चाहते आहेत. अशी बरीच मंडळी आहेत जी त्यांच्या मोकळ्या वेळेत मनोरंजनाचे साधन म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम पाहतात. या कार्यक्रमातील कलाकारांनी आजवर त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं आहे. या कार्यक्रमातील कलाकारांचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर हास्यजत्रेतील ही कलाकार मंडळी नेहमीच सक्रिय असतात. (Gaurav More Exit From Mhj)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, गौरव मोरे, इशा डे, रसिका वेंगुर्लेकर, निखिल बने, ओंकार राऊत यांसारखी अनेक कलाकार मंडळी धुमाकूळ घालत असतात. मात्र ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील एका कलाकाराकडून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हास्यजत्रेतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला गौरव मोरेने या कार्यक्रमाला कायमचा रामराम ठोकला आहे. याबाबतची पोस्ट सोशल मीडियावरुन शेअर करत त्याने ही बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. गौरव सध्या हिंदी रिऍलिटी शो ‘मॅडनेस मचाऐंगे’मध्ये धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी अभिनेता ओंकार भोजनेनेही हास्यजत्रेतून एक्झिट घेतली. आता ओंकार पाठोपाठ गौरवही ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतून बाहेर पडला आहे.
गौरवची ही पोस्ट पाहून सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. गौरवच्या काही चाहत्यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी गौरव हास्यजत्रेत दिसणार नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली. दरम्यान गौरवच्या या पोस्टवर त्याचे हास्यजत्रेतील सहकलाकार समीर चौघुले व प्रसाद खांडेकरनेही कमेंट केलेली पाहायला मिळत आहे. समीरने कमेंट करत, “तुला खूप शुभेच्छा गौरव. खूप प्रेम”, असं म्हटलं. तर प्रसादने कमेंट करत, “भावा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा”, असं म्हटलं.

गौरवने पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “नमस्कार, पवई फिल्टरपाड्यातून मी गौरव मोरे. तानानानाना. आरा बाप मारतो का काय मी…ये बच्ची… रसिक प्रेक्षक आपण या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं. सन्मान दिला. त्याबद्दल मी व माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत. मला सांगताना खूप वाईट वाटत आहे की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधुन आपला निरोप घेत आहे. माझ्या कामातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासुन माफी मागतो”.