‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या कार्यक्रमातून आजवर अनेक कलाकार मंडळींनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली. अफलातून विनोदी शैली व उत्तम अभिनयाने गौरव मोरेने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. गौरवचे हास्यजत्रेतील स्किट्स संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालताना दिसतात. आजही प्रेक्षक हे स्किट्स आवडीने पाहतात. गौरवचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अशातच काही दिवसांपासून गौरव ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये दिसत नसल्याने या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. (Gaurav More Exit From MHJ)
आता अखेर गौरवने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्याचा दावा करत सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. हास्यजत्रेतून याआधी ओंकार भोजनेने एक्झिट घेतली आता त्यानंतर गौरव मोरेने सोशल मीडियावर हास्यजत्रेला रामराम केला असल्याचं सांगितलं. गौरवने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हास्यजत्रेच्या सेटचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आणि यामध्ये त्याने कायमची हास्यजत्रा सोडलं असल्याचं सांगितलं.
गौरवने पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “नमस्कार, पवई फिल्टरपाड्यातून मी गौरव मोरे. तानानानाना. आरा बाप मारतो का काय मी…ये बच्ची… रसिक प्रेक्षक आपण या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं. सन्मान दिला. त्याबद्दल मी व माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत. मला सांगताना खूप वाईट वाटत आहे की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधुन आपला निरोप घेत आहे. माझ्या कामातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासुन माफी मागतो”.
यापुढे त्याने असं लिहिलं आहे की, “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो. माध्यम सारखंच आहे आणि तुमचं प्रेम देखील. असं म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शोसाठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरु झाला आणि यातून देखील तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद, शुभेच्छा व प्रेम असंच राहू दे”. गौरवच्या या पोस्टवर त्याच्या चाहतेमंडळींनी कमेंट करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.