संत तुकाराम – विठ्ठलाचे परम भक्त, विठ्ठलाच्या भजनात, नामस्मरणात, कीर्तनात ते स्वतः सदैव रंगून जायचे. ह्या विठ्ठलाच्या भक्तीमुळे तुकारामाची बायको आवली हिला त्यांचा राग यायचा पण तरीही तिची माया तुकारामांवर होतीच. आपण आपल्या माणसावर रुसतो,, रागावतो,, पण ते रागावणं हा आपला हक्कच असतो. आपले प्रेम त्या व्यक्तीवर असल्याने राग-अनुरागाच्या भावना आपल्या मनांत उमटतात, परंतु किती काळ राग मनी धरावा ह्याला काही मर्यादा आहेतच.

भद्रकाली प्रोडक्शन निर्मित संगीत देवबाभळी नाटकाचे सादरकर्ते प्रसाद कांबळी हे असून निर्माती श्रीमती कविता मच्छिन्द्र कांबळी ह्या आहेत, लेखन – दिगदर्शन प्राजक्त देशमुख यांच आहे. नेपथ्य प्रदीप मुळ्ये, प्रकाश योजना प्रफुल्ल दीक्षित, संगीत आनंद ओक, पार्श्वगायन आनंद भाटे, यांनी केलं असून यामध्ये शुभांगी सदावर्ते, मानसी जोशी यांनी त्यांच्या भूमिका गायन – अभिनयासह अप्रतिम सादर केल्या आहेत.

आवली गर्भार असताना तुकोबांना माळरानावर शोधत असताना तिच्या पायात देवबाभळी चा काटा घुसला आणि तिची शुद्ध हरपली, तेंव्हा तिच्या पायातला काटा काढायला साक्षात पांडुरंग अवतरला आणि त्याच वेळी विठ्ठल रखुमाईचे भांडण झालं आणि रखुमाई दुसरीकडे राहायला गेली. त्या मागचं कारण  देवबाभळी आहे अशी एक कथा आहे. विठ्ठल काटा काढून थांबत नाही, तर त्या जखमेचं निमित्त करूनच विठ्ठलाने रखुमाईला आवलीच्या घरी तिची [ आवलीची ] काळजी घ्यायला पाठवलेलं असून ती जखम पूर्ण होईपर्यंत तू तिथेच थांब असेही सांगितले आहे, पांडुरंगाने परस्रीचा [ आवली ] पाय हातात घेतला, ती स्त्री कोण आहे हे बघण्याची उत्सुकुता रखुमाईला आहेच, त्यासाठी ती तुकाराम – आवलीच्या घरी आलेली आहे. 

तसं रखुमाई हि भांडण करायलाच तिच्या कडे आलेली आहे. ” आवली – तुकाराम ” यांचं भांडण आहेच, तुकाराम – विठ्ठलाचं हे एक भक्ती-प्रेमाचं भांडण एकमेकातलं आहे, अशी हि एकमेकांच्या बरोबर असलेली भांडण ह्या नाटकात लेखकाने कल्पकतेने रंगवली आहेत. विठ्ठल-तुकाराम यांची बाजू सगळ्यांना माहिती आहे, पण आवली – रखुमाईंची बाजू नेमकी काय आहे ते ह्या नाटकात सादर केलं आहे, आवलीचा नवरा तुकाराम, आणि रखुमाईंचा नवरा विठ्ठल हे दोघेजण ह्या क्षणी ” विरक्त ” झाले आहेत, ह्या ” विरक्ती ” च्या सावल्या आहेत, ह्यावर नाटकाचा पाया उभारलेला असतानाच, आवली आणि रखुमाई ह्या दोघी एकमेकींच्या, म्हणजे पर्यायाने विठ्ठलाचा आणि तुकारामांचा भक्ती परंपरेच्या अस्तित्वाचा मागोवा घेतात.

रखुमाई आवलीच्या घरात विठ्ठलाची मूर्ती घेऊनच प्रवेश करते, आपल्या घरी हि कोण परकी बाई विठ्ठलाची मूर्ती घेऊन आली आहे असा प्रश्न आवलीला पडतो, त्याप्रमाणे ती तिला विचारते, त्यांच्या संवादातून ती सुद्धा विठ्ठलाची भक्ती करणारी आहे असे समजल्यावर आवलीचा राग अनावर होतो, पण तिच्या पायाच्या जखमेची काळजी ज्यावेळी रखुमाई घ्यायला लागते त्यावेळी आवली चा राग काही प्रमाणात शांत होतो तिच्यात बदल होतो. आवलीच्या मनांत विठ्ठला विषयीचा राग प्रथम पासून आहेच पण आता रखुमाई सुद्धा विठ्ठलाच्या विषयी मनात राग धरूनच आवली कडे आलेली आहे. दोघांची मने ह्या दृष्टीने जुळलेली आहेत,

आता पुढे नेमके काय घडते ते तुम्ही नाटक पाहूनच अनुभवा.देवबाभळी हे संगीत नाटक आहे, शुभांगी सदावर्ते यांनी आवली ची भूमिका आणि मानसी जोशी यांनी रखुमाई ची भूमिका संपूर्ण नाटक गायन आणि अभिनयातून समर्थपणे पेलली आहे, गायन, अभिनय, संवाद, देहबोलीच्या हालचाली अप्रतिमपणे सादर केल्या आहेत. नाटकांचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांनी तुकोबाचा वाडा, आजूबाजूचा डोंगराचा परिसर लेव्हल चा योग्य तो उपयोग करून सुरेख / सूचकपणे साकारला आहे. त्यालाच अनुसरून प्रकाश योजना प्रफुल्ल दीक्षित यांनी केली आहे.

आनंद ओक यांनी दिलेलं संगीत नाटकाची उंची वाढवते, आनंद भाटे यांचे गायन हि एक जमेची बाजू आहे. लेखक – दिगदर्शक प्राजक्त देशमुख यांनी नाटक उत्तम बंदिस्तपणे सादर केलं असून प्रत्येक प्रसंग उठावदार केला असल्याने प्रेक्षक त्यात रंगून जातो. एक समाधान देणारी संगीतमय नाटयकृती आहे.