‘झी मराठी’ वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. अशातच बरेच दिवसांपासून सुरु असलेली ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. कारण अप्पी व अर्जुन दोघेही आता वेगवेगळ्या वाटेवर प्रवास करणार आहेत. अप्पीची कलेक्टर म्हणून उत्तराखंडला बदली झालेली असते. अर्जुनला ही गोष्ट समजते तेव्हा आईबद्दल गोष्टी लपवल्यामुळे तो राग मनात ठेवत तो अप्पीबरोबर न जाता तिथेच राहणं पसंत करतो. (Appi amachi collector sairaj kendre entry)
दरम्यान अप्पी पुढेही काहीच पर्याय नसल्याने ती उत्तराखंडला निघून जाते. अप्पी आणि अर्जुनच्या आयुष्यात या बदलीमुळे मोठं वळण आलेलं पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये अप्पी उत्तराखंडला तिचं कर्तव्य बजावताना दिसत आहे. त्याचबरोबर तिचा लेकही मोठा झालेला मालिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकेत तब्बल सात वर्षांचा लीप पाहायला मिळणार आहे.
विशेष म्हणजे नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अप्पीच्या मुलाची भूमिका साईराज साकारणार आहे. ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’, हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. गणपतीच्या दिवसांत हे गाणं चांगलंच ट्रेण्डिंगमध्ये असलेलं पाहायला मिळालं. हे मूळ गाणं माऊली घोरपडे व शौर्या घोरपडे या दोन भावंडांनी गायलं आहे. परंतु, या गाण्यावर बालकलाकार साईराज केंद्रेने शेअर केलेला व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता.
या गाण्यातून साईराजच्या निरागसतेची झलक दिसली. त्याच्या गोंडस हावभावाने त्याने सर्वांची मनं जिंकली. या गाण्यानंतर आता साईराज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये साईराजची झलक पाहायला मिळाली. शाळेच्या गणवेशात तो खूपच सुंदर दिसत होता. अप्पीने अर्जुनला वचन दिलेलं असत की, ती त्यांच्या मुलाला वडिलांबद्दल सांगणार नाही. मात्र मालिकेच्या प्रोमोमध्ये अर्जुन व अमोलची भेट होताना पाहायला मिळणार आहे. अप्पी प्रदक्षिणा घालायला जाते तेव्हा अमोल व अर्जुनची भेट होते. दोघेही एकमेकांचे मित्र बनतात. आता अमोल हा अर्जुनचा लेक आहे हे सत्य त्यांच्यासमोर केव्हा येणार हे पाहणं रंजक ठरेल.