हिंदी टेलिव्हिजन जगातील अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. या मालिकांच्या यादीत एका मालिकेचं नाव आवर्जून घेतलं जाईल ते म्हणजे ‘पवित्र रिश्ता’. २००९ मध्ये प्रसारित झालेल्या या मालिकेने पाच वर्षे म्हणजेच २०१४ पर्यंत प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं होतं. या मालिकेत अंकिता लोखंडेने अर्चना ही भूमिका साकारली होती, तर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मानवची भूमिका साकारली होती. मालिकेचं कथानक हे कौटुंबिक होतं. प्रेक्षकांनीही या मालिकेला आणि मालिकेतील कलाकारांना भरभरुन प्रेम दिलं. (Ankita Lokhande shared pavitra rishta memories)
आज या मालिकेला संपून १५ वर्ष झाली आहेत. असं असलं तरी या मालिकेच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. या आठवणींमध्ये भर घालत अंकिता लोखंडेने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये तिने मालिकेतील खास क्षण व्हिडीओरुपी शेअर केले असून या पोस्टखाली कॅप्शन देत असं म्हटलं की, “१५ वर्षांपूर्वी ‘पवित्र रिश्ता’मध्ये अर्चना म्हणून माझा प्रवास सुरु झाला. मला माहीत नव्हते की, इतक्या वर्षांनंतरही मला माझ्या भूमिकेसाठी इतके प्रेम मिळत राहील. जी माझी ओळख बनली आहे. मला कधी-कधी वाटते की, मी अर्चना होण्याचे माझ्या नशिबात होते. ती माझ्यात होती आणि माझ्यात राहिली. तिने मला आयुष्याबद्दल खूप काही शिकवले आहे”.
पुढे तिने असं लिहिलं आहे की, “माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मला आयुष्यभराची भूमिका दिल्याबद्दल मी एकता कपूर यांची कायम ऋणी आहे. मी या जगात असेन वा नसेन पण माझी ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमधील अर्चना या भूमिकेसाठीच प्रेम कायम तुमच्या हृदयात असेल आणि यापेक्षा अधिक मौल्यवान काही असेल असे मला वाटत नाही. पण सुशांतची साथ नसती तर माझा प्रवास पूर्ण होणारा नव्हता”.
“जेव्हा मी ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत काम करायला सुरुवात केलं तेव्हा मला अभिनय कसा करावा हे देखील माहित नव्हते. याचे धडे मला सुशांतने दिले आणि यासाठी मी नेहमीच त्याची आभारी राहीन. या शोने कथाकथनाचा एक नवीन प्रकार सुरु केला. हिंदी टेलिव्हिजनवर मराठी संस्कृती दाखविली. यापूर्वी अशा आशयाची मालिका कधी आली नव्हती. या मालिकेचा निरागसपणा आणि मालिकेत सामील असलेले लोक या या मालिकेला उंचावर नेऊ शकले. आणि सर्वात शेवटी, मला इतके प्रेम दिल्याबद्दल मी मालिका विश्वाचे आभार मानू इच्छिते. माझा चाहतावर्ग हा एका मालिकेमुळे घडला आणि त्याबद्दल मी नेहमीच आभारी राहीन”.