Malayalam Actor Death News : मल्याळम चित्रपटसृष्टीतील माजी बालकलाकार हरी मुरली यांचे अवघ्या 27 व्या वर्षी निधन झाले आहे. केरळमधील पय्यनूर येथे असलेल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या अकाली निधनामुळे चाहत्यांमध्ये आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. सध्या त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नसून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. हरि मुरली यांनी लहान वयातच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. केवळ सहा वर्षांचे असताना त्यांनी 2004 साली प्रदर्शित झालेल्या Rasikan या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्यांनी मल्याळम सुपरस्टार दिलीप यांच्यासोबत काम केले होते.
आपल्या निरागस अभिनयामुळे आणि सहजतेमुळे त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. यानंतर काही काळ त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चित्रपटसृष्टीपासून थोडे अंतर घेतले. पुढे 2015 साली प्रदर्शित झालेल्या Amar Akbar Anthony या सुपरहिट चित्रपटातून त्यांनी पुन्हा पडद्यावर पुनरागमन केले. या चित्रपटात त्यांनी अभिनेता Prithviraj Sukumaran यांच्या लहान भावाची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. हरि मुरली यांचे वडील पय्यनूर मुरली हे देखील मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यामुळे अभिनयाची आवड त्यांना घरातूनच मिळाली होती आणि लहानपणापासूनच त्यांचा चित्रपटसृष्टीशी जवळचा संबंध होता.
आणखी वाचा – अखेर अभिनेत्री ईशा डे आणि अभिषेकचा विवाहसोहळा संपन्न; पारंपरिक अंदाजात पार पडलं लग्न; फोटो समोर
नंतरच्या काळात हरि मुरली यांनी अभिनयाऐवजी चित्रपटसृष्टीच्या मागच्या बाजूने काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बेंगळुरूमधून व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अॅनिमेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते चेन्नई येथे VFX आर्टिस्ट म्हणून काम करत होते. पडद्यावर कमी दिसत असले तरी फिल्ममेकिंग आणि क्रिएटिव्ह क्षेत्राशी त्यांचा संबंध कायम होता. त्यांनी काही टीव्ही मालिकांमध्येही काम केले होते. अवघ्या 27 व्या वर्षी एका उभरत्या कलाकाराचे असे अचानक निधन होणे अत्यंत धक्कादायक मानले जात आहे. त्यांच्या निधनामुळे केवळ कुटुंबीयांनाच नव्हे तर मल्याळम चित्रपटसृष्टीनेही एक गुणी आणि मेहनती तरुण कलाकार गमावला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.





