अभिनेते नाना पाटेकर यांनी आजवर अनेक चित्रपटांतून विविध भूमिका करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे नाना गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी नानांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नानांनी वाराणसीमध्ये शूटिंग करत असताना सेल्फी घ्यायला आलेल्या एका मुलाला डोक्यात मारलं होतं. यावरून सोशल मीडियासह अनेक माध्यमांमध्ये चर्चा रंगल्या होत्या.
या प्रकारामुळे नानांना नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्याचबरोबर त्यांना अनेक नेटकरी व चाहत्यांची नाराजीही पत्करावी लागली होती. अर्थात या प्रकरणानंतर नानांनी एक व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली होती. मात्र या प्रकरणाला पुन्हा एकदा एक नवीन वळण आलं आहे. माजी आय.ए.एस. अधिकारी अभिषेक सिंगने नानांना धमकी दिली आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
IAS Abhishek Singh ने नाना पाटेकर को दिया उत्तम जवाब … #abhisheksingh #nanapatekar #UttarPradesh #Varanasi pic.twitter.com/uFPBCyjTR2
— Abhishek Dubey (@AbhishekDube000) November 23, 2023
अभिषेकने हा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक माध्यमांनी मी नानांविरुद्ध तक्रार केली असल्याचे सांगितले. पण मी अद्याप असं काही केलेलं नाही. जेव्हा तुम्ही उत्तर प्रदेशात येता. तेव्हा आमचं सरकार तुम्हाला सबसिडी देतं. उत्तर प्रदेशातील लोक तुम्हाला सन्मान देतात. तुमचं आदरातिथ्य करतात. पण त्याबदल्यात तुम्ही आम्हाला कानाखाली मारता? हे कुणालाही आवडणार नाही. आमचं सगळंच उत्तम आहे. ज्याप्रमाणे आमचा सन्मान, स्वागत उत्तम आहे. तसाच आमचा मारदेखील उत्तम आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशच्या लोकांना उत्तरही चांगलंच देता येतं. त्यामुळे पुढच्या वेळी याल तेव्हा नीट या.”
दरम्यान नाना पाटेकर यांनी जेव्हा त्या तरुणाला मारलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी एका पत्रकार परिषदेत माजी अधिकारी अभिषेकने हा प्रकार चुकीचा असल्याचे म्हटले होते. यानंतर पुन्हा एकदा अभिषेकने या व्हिडीओद्वारे त्याचे मत मांडले आहे. त्यामुळे आता या व्हिडीओला नाना काय उत्तर देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.