झी मराठी वाहिनीवर नव्यानेच सुरू झालेली ‘पारू’ ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे. मालिकेचे कथानक व कलाकारांच्या अभिनयाने या मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. इतकेच नव्हे तर मालिकेतील पारू व आदित्यची जोडी ही प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी पारू सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. अशातच तिने काल (३ मे) शेअर केलेल्या फोटोने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले.
शरयूने काल तिच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत काही खास फोटो शेअर केले. “३६५ दिवसांच्या अविस्मरणीय आठवणी, वचनबद्धता आणि निरंतर प्रेम. आमच्या सुंदर प्रवासाचे एक वर्ष साजरे करत आहोत”असं म्हणत तिने लग्नाचे फोटो पहिल्यांदाच शेअर केले आहेत. तिने लग्नाच्या वर्षपूर्तीनिमित्ताने शेअर केलेल्या फोटोमुळे तिच्या चाहत्यांसह साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. आपल्या भूमिकेने चर्चेत राहणारी ही अभिनेत्रीने काल (३ मे) शेअर केलेल्या तिच्या लग्नाच्या फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली.
शरयूने तिच्या लग्नात लाल रंगाची सुंदर नक्षीकाम असलेल्या काठाची भरजरी नऊवारी पैठणी परिधान केली होती आणि त्यावर हिरव्या रंगाचा नक्षीकाम असलेला शाल घेतली होती. त्याचबरोबर गुलाबी रंगाचा डिझाईनर ब्लाऊजही परिधान केला होता. तसेच हातावर व पायावर सुंदर अशी मेहंदीही काढली होती. तर तिचा नवरा जयंतने पांढऱ्या रंगाचा कुर्ता त्यावर लाल रंगाचे धोतर व लाल रंगाचा डिझाईनर शेला परिधान केला होता. दरम्यान, हातात हिरव्या बांगड्या, कपाळाला मुंडावळ्या, हाता-पायावर मेहंदी, गळ्यात सुंदर दागिने आणि या खास लूकला साजेश्या साजशृंगारामुळे अभिनेत्रीचे सौंदर्य खूपच खुलून आले होते.
दरम्यान, याआधी शरयूने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन तिच्या व जयंतच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता तिने थेट तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. शरयूच्या या लग्नाचे हे खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या खास फोटोंना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. शरयूने शेअर केलेल्या या फोटोंवर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांसह शरयूच्या चाहत्यांनी तिला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छाही दिल्या आहेत.