‘सीआयडी’ या लोकप्रिय शोचे अनेक चाहते आहेत. गेली अनेक वर्ष या शोने व शो मधील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवले आहे. या शोमधील अनेक कलाकार प्रेक्षकांच्या आवडीचे आहेत. अशातच या शो मधील एक मुख्य कलाकार इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स उर्फ दिनेश फडणीस यांच्याबाबतची एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांना काल (३ डिसेंबर) हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ते व्हेंटिलेटरवर असून मरणाशी झुंज देत असल्याचे म्हटले जात आहे. (CID fame Dinesh Phadnis Heart Attack)
अशातच अभिनेते दयानंद शेट्टी यांनी दिनेशच्या प्रकृतीबाबत अपडेट देत त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी असे म्हटले आहे की, “दिनेश फडणीस हॉस्पिटलमध्ये दाखल असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. पण त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त खोटं असून त्याच्यावर सध्या इतर आजारावरील उपचार सुरू आहेत. सध्या यावर मी भाष्य करू इच्छित नाही. पण त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्याची आम्ही वाट बघत आहोत. त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी आपण सगळेच प्रार्थना करुयात” असेही त्यांनी म्हटले आहे.
दिनेश यांनी ‘सीआयडी’ या लोकप्रिय इन्स्पेक्टर फ्रेडरिक्सची भूमिका साकारली होती. या शोमधील त्याच्या व्यक्तिरेखेला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. त्याने या शोमध्ये अनेक वर्षे काम केले. या शोमधील त्याची हलकी फुलकी कॉमेडीही चाहत्यांना आवडली होती. ‘सीआयडी’ व्यतिरिक्त ते ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्येही दिसले होते. या शोमध्ये त्यांनी छोटीशी भूमिका केली होती. पण त्यांच्या छोट्याश्या भूमिकेने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच आमिर खानच्या ‘सरफरोश’ या चित्रपटातही त्यांनी काम केले होते.
आणखी वाचा – हळद लागली! मुग्धा वैशंपायनच्या बहिणीची लगीनघाई, हळदीचे फोटो समोर, पोस्ट शेअर करत म्हणाली, “ताईची…”
दरम्यान, त्यांच्या तब्येतीबाबत अचानक आलेल्या वृत्ताने चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण पाहायला मिळाले आहे. त्यांचे अनेक चाहते त्यांच्या तब्येतीच्या वृत्ताने आश्चर्यचकित झाले. अनेक चाहते त्यांच्या लवकर बरे होण्याची वाट पाहत आहेत. तसेच त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थनाही करत आहेत. नव्वदीपासून अविरत मनोरंजन करणारा हा अभिनेता बराच काळ मनोरंजसृष्टीपासून लांब आहे.