सध्या परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणे हे अगदी सहज व सोपे झाले आहे. त्यामुळे भारतात पुरेसे शिक्षण घेतल्यानंतर अनेक भारतीय परदेशात कूच करतात. मराठीतील काही कलाकारदेखील आपल्या उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात. अशातच ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम अभिनेत्री तिच्या उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात गेली होती. ऑस्ट्रेलियात ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे तिथे तिला काही गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. आणि याच संदर्भात तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत असे म्हटले आहे की, “आम्हाला गेल्या अनेक दिवसांपासुन हिटर – एअरकॉन डिव्हाईस बिघडल्याने त्रासदायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात मी गेल्या चार महिन्यांपाससून ई-मेलद्वारे संपर्क करत आहे. इतका त्रास होऊनही आम्ही दर महिन्याला भाडे भरतो. यावर ना कोणता, उपाय ना आम्हाला याची आर्थिक भरपाई दिली आहे. दरम्यान या संपूर्ण परिस्थितीचा आमच्या राहणीमानावर व मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.”
यापुढे तिने “इतक्या प्रसिद्ध संस्थेकडून आम्हाला याची अपेक्षा नव्हती. जे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पुढील शैक्षणिक सत्रासाठी ऑस्ट्रेलियाला जात आहेत त्यांनी या संस्थेची निवड करू नका.” असं म्हटलं आहे. तसेच तिने तिच्या पोस्टमध्ये त्या संस्थेचं नाव मेन्शन करत ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करण्याची विनंतीदेखील केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय यादरम्यान तिला झालेल्या त्रासाबद्दल आवाज उठवल्याबद्दल तिचं कौतुकही केलं आहे.
दरम्यान, अन्विताने ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. मुख्य अभिनेत्री म्हणून ही तिची पहिलीच मालिका होती. या मालिकेतील स्विटूच्या भूमिकेला अमाप लोकप्रियता मिळाली होती. दरम्यान मालिका संपल्यानंतर तिने पुढील शिक्षणासाठी विदेशात जाण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वीच ती शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेली.