बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री कंगना रणौत ही गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. नुकतेच तिला हिमाचल प्रदेशमधील मंडी या भागातून लोकसभा निवडणूक २०२४ लढवण्याचे तिकीट मिळाले आहे. तिच्या राजकारणातील प्रवेशामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अशातच तिच्याबद्दल अनेक स्तरातून विविध प्रतिक्रियादेखील उमटल्या आहेत. कंगनाने तिला तिकीट मिळाल्यानंतर आपल्या भावनाही माध्यमावर व्यक्त केल्या होत्या. तिने मंडीतून तिकीट मिळाल्याने खूप आभार व्यक्त केले होते. पण अशातच आता तीचे जुने ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (kangana ranaut viral tweet)
कंगनाला निवडणुकांचे तिकीट मिळाल्यानंतर विविध स्तरातून तिच्याबद्दल चर्चा सुरु झाली. तीचे काही विवदात्मक व्हिडीओदेखील प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले. आशातच तीचे आता तीन वर्षांपूर्वीचे जुने ट्विट व्हायरल झाले असून त्याबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे. जाणून घेऊया तिने या ट्विटमध्ये काय म्हंटले होते.
तिने या ट्विटमध्ये लिहिले होते की, “मी २०१९ लोकसभा निवडणुकांसाठी ग्वाल्हेरचा पर्याय दिला होता. हिमाचल प्रदेशची लोकसंख्या ६० ते ७० लाख आहे. या ठिकाणी गरीबी व गुन्हा अजिबात नाही. जर मी राजकारणात आले तर मला अशा ठिकाणी उभे राहायला आवडेल जया ठिकाणी काम करण्याची संधी असेल. मी त्या भागाची राणी होऊ शकेन. तुमच्यासारखे छोटे लोक ते समजू शकणार नाही”.
तसेच जेव्हा तिची लोकसभा निवडणुक २०२४ साली तिच्या नावाची घोषणा झाली तेव्हाही तिने एक पोस्ट लिहिली त्यामध्ये तिने लिहिले की, “माझ्या प्रिय भारतियांनो व भारतीय जनता पक्ष, मी आतापर्यंत नेहमीच भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत आले आहे. आज भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्त्वामुळे माझे जन्मस्थान असलेल्या हिमाचल प्रदेशामधून निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे”.
तिच्या या दोन्ही ट्विटमध्ये खूप अंतर असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरुन तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीकादेखील होत आहे. दरम्यान कंगनाचे राजकारणातील भविष्य काय असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कंगनाने आतापर्यंत ‘फॅशन’, ‘तनु वेड्स मनू’, ‘तनु वेड्स मनू रिटर्न’, ‘क्वीन’, ‘मणिकर्णिका’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.