अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान, अभिनेता काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आलेला पाहायला मिळाला. नवाजुद्दीन सिद्दीकी व त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यातील वाद चर्चेत आला. दोघांनीही एकमेकांवर आरोप करत वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, दोघेही त्यांच्या नात्यातील खडतर प्रवासातून गेल्यानंतर, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांनी मुलगी शोरा व मुलगा यानी यांच्या फायद्यासाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. (Nawazuddin Siddiqui and Aaliya Siddiqui)
आलियाने अलीकडेच तिचा व नवाजुद्दीनच्या लग्नाच्या १४ वाढदिवसानिमित्त एकत्र कुटुंबाचा फोटो सोशल मीडियावरुन पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून अनेकांनी ते एकत्र आले असल्याचं म्हटलं आहे. तर नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकीने ‘इटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, नवाजुद्दीन तिला व मुलांना भेटायला दुबईला आला होता. आलिया म्हणाली, “माझ्या आयुष्यात अलीकडच्या काळात काही गोष्टी बदलल्या आहेत. मला वाटलं की आपण वाईट गोष्टी जगाबरोबर शेअर करतो तर चांगल्या गोष्टीही केल्या पाहिजेत. नवाज इथे होता, त्यामुळे आम्ही मुलांबरोबर लग्नाचा वाढदिवस साजरा केला. इतकंच नाही तर नवाजुद्दीन डिसेंबर २०२३ मध्ये दुबईमध्ये होता. आम्ही सर्वांनी एकत्र नवीन वर्षाचंही स्वागत केलं होतं”.
आलिया पुढे म्हणाली, “आमच्या नात्यात आम्हाला ज्या समस्यांना सामोरं जावं लागलं त्या नेहमीच तिसऱ्या व्यक्तीमुळे होत्या असं मला वाटतं. पण आता सगळे गैरसमज दूर झाले आहेत. आमच्या मुलांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आता आयुष्यात वेगळे राहण्याचा पर्याय नाही, कारण मुलंही मोठी होत आहेत. तसेच आमची मुलगी शोरा तिच्या बाबांच्या खूप जवळ आहे, त्यामुळे जे घडलं त्यावर ती नाराज होती. या गोष्टींचा तिला त्रास होत होता, म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही न भांडता एकत्र राहू”.
नवाजुद्दीन व आलिया यांच्यातील सर्व गैरसमज दूर झाले असून दोघेही आनंदाने एकत्र राहत आहेत. नुकताच त्यांनी त्यांच्या लग्नाचा १४वा वाढदिवस दुबईत साजरा केला. पत्नी व मुलांबरोबर वेळ घालवून नवाजुद्दीन मुंबईला परतला आहे. तर मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्यानंतर आलिया मुलांना घेऊन भारतात परतणार आहे.