Dada Kondke Birth Anniversery : मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचे सम्राट अभिनेते, दिग्दर्शक दादा कोंडके यांची येत्या ८ ऑगस्टला ९१ वी जयंती आहे. दादांनी केवळ मराठी चित्रपटसृष्टी नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या मनावरही राज्य केलं आहे. दादांचा चित्रपट एकदा का प्रदर्शित झाला, की तो सलग २५ आठवडे उतरण्याचं नाव घेत नव्हता. दादांच्या चित्रपटांतील असलेल्या अंदाजामुळे सलग ९ चित्रपटांनी ‘सिल्वर ज्युबिली’ आठवडे साजरे करत दादा कोंडकेंनी गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलं आहे. (Dada Kondke Birth Anniversery)
दादांच्या चित्रपटांची नावे असो, किंवा संवाद. जरी ते ऐकण्यास व बघण्यास द्विअर्थी वाटत असले तरी सेन्सॉर बोर्डालादेखील त्यांच्या चित्रपटांवर कधीच बंदी घालता आली नाहीत. आपल्या दमदार अभिनयाने आणि लिखाणाने दादांनी केवळ मराठी प्रेक्षकांनाच नाही, तर हिंदी प्रेक्षक व कलाकारांना वेड लावलं होतं. त्यामुळे अनेक कलाकार आजही दादांविषयी भरभरून बोलतात. त्यांच्या जयंतीनिमित्त दादांच्या अनेक आठवणींना कलाकार मंडळी उजाळा देत असताना हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांनीही दादांविषयी सांगितलेला एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शक्ती कपूरनी सांगितली दादांची ‘ही’ आठवण (Shakti Kapoor on Dada Kondke)
शक्ती कपूर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत दादांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. सोबतच माणूस म्हणून दादा किती मोठ्या मनाचे होते, हेदेखील सांगताना शक्ती कपूर यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. या व्हिडिओत शक्ती कपूर म्हणतात, “दादांसोबत काम करायला मिळणं हे त्या काळात खूप काही शिकण्यासारखं होतं. यासाठी मीदेखील स्वतःला भाग्यवान समजतो. मी दादांसोबत ‘आगे की सोच’ या हिंदी चित्रपटात काम केलं. त्याचं शूटिंग दादांच्या फार्म हाऊसवरच सुरू होतं. मी सहज दादांना विचारलं की, या तुमच्या फार्महाउसचा एरिया किती आहे. तेव्हा दादा म्हणाले, तुझी जिथंपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हे आपलंच फार्म हाऊस आहे. दादांचं हे उत्तर ऐकून मी अवाक् झालो. खरंच इतक्या मोठ्या जागेचा मालक माझ्यासमोर होता आणि त्याला अजिबात गर्व नव्हता.”
हे देखील वाचा – ६ ऑगस्टपासून रविवार असणार ‘ज्युबिलीस्टार’ दादा कोंडकेंचा वार ! झी टॉकीज दाखवणार दादा कोंडकेंचे ६ ‘सिल्वर ज्युबिली’ चित्रपट
आजकाल आपल्या संपत्तीचा डामडौल करणारी मंडळी पाहिली की मला दादांच्या त्या संवादाची आठवण येते, असं शक्ती कपूर म्हणाले. पुढे दादा गावच्या मातीशी किती जोडलेले आहेत हे सांगताना म्हणाले, “आम्ही जोपर्यंत त्या फार्म हाऊसवर शूटिंग करत होतो, तेव्हा दादांनी मला गावचं जेवण खायला दिलं आणि माझं मन तृप्त केलं. गावी रोज संध्याकाळी दादांकडे खूप लोक यायची. गावातील काही तरूण यायचे, म्हातारी माणसे यायची आपल्या समस्या मांडायचे आणि दादा त्यांना मुक्त हस्ते मदत करायचे. दादांनी कधीही त्यांच्या दातृत्वाची दवंडी पिटली नाही.” (Shakti Kapoor on Dada Kondke)
हे देखील वाचा – ‘ते नाटक पाहून आशाताईंनी आत्महत्येचा निर्णय बदलला’
“ॲडव्हान्स इनकम टॅक्स भरणारे दादा कोंडके हे एकमेव कलाकार असतील. ते नेहमी ज्यादाची रक्कम टॅक्स भरून ठेवायचे जेणेकरून त्यावरून त्यांच्याकडे कुणी बोट दाखवू नये, असे त्यांना वाटायचे. सध्या अशी माणसं देवाने बनवणं बंद केलय . एक अत्यंत काटेकोर, शिस्तबध्द आणि तितकेच संवेदनशील माणूस असलेल्या दादांनी मराठी चित्रपटसृष्टीला जे सिनेमे दिले आहे ते कधीच जुने होणार नाहीत इतका त्यात उत्साह आहे”, असे शक्ती कपूर म्हणाले. (Shakti Kapoor on Dada Kondke)

हे देखील वाचा – दादा कोंडकेंसोबतचा ‘तो’ सीन करण्यास अशोक मामांनी दिला होता नकार, ‘घाबरून म्हणाले की..’