Nitin Desai Funeral Update : बुधवारी (२ ऑगस्ट) सकाळी एनडी स्टुडिओ येथे गळफास घेत सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणाबाबत सध्या पोलिस योग्य तो तपास करत आहे. आत्महत्येनंतर दोन दिवसांनी आज नितीन देसाई यांच्या पार्थिवावर कर्जतच्या एनडी स्टुडिओवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. एनडी स्टुडिओमध्ये अंतिम दर्शनासाठी नितीन देसाईंचं पार्थिव ठेवण्यात आलं आहे. यादरम्यानचे व्हिडीओ आता समोर आले आहेत. (Nitin Desai Suicide)
नितीन देसाईंच्या पार्थिवावर आज सायंकाळी चार वाजता ‘जोधा अकबर’च्या सेटवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. दरम्यान आज सकाळपासूनच एनडी स्टुडिओच्या बाहेर अनेकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना शेवटचं पाहण्यासाठी सध्या स्टुडिओच्या परिसरामध्ये तुफान गर्दी जमली आहे. याच स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार व्हावे अशी त्यांची शेवटची इच्छा होती.
आत्महत्येपूर्वी नितीन देसाई यांनी चिट्ठी लिहिली होती. या चिट्ठीमध्ये त्यांनी त्यांची शेवटची इच्छा बोलून दाखवली. त्यांच्या इच्छेप्रमाणेच आज त्यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. फुलांनी ट्रक सजवण्यात आला आहे. तसेच या स्टुडिओमधील ‘जोधा अकबर’च्या सेटवरही विशेष तयारी करण्यात आली आहे. याआधी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयामध्ये नितीन देसाईंचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं.
काही वेळापूर्वीच नितीन देसाई यांचं पार्थिव एनडी स्टुडिओमध्ये दाखल झालं आहे. उदयनराजे भोसलेही या स्टुडिओमध्ये दाखल झाले आहेत. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जे.जे. रुग्णालयामध्येच नितीन देसाई यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं होतं. राजकीय मंडळींसह कलाविश्वातील अनेक मंडळी आज एनडी स्टुडिओमध्ये हजेरी लावण्याची शक्यता आहे. फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून नितीन देसाई यांचं पार्थिव ‘जोधा अकबर’च्या सेटवर आणण्यात आलं. यावेळी त्यांना पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.