बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा नेहमीच खूप चर्चेत असतो. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही तो अधिक चर्चेत राहिला आहे. आमिर खान दोन वेळा लग्नबंधनात अडकला. १९८६ साली तो रिना दत्ताबरोबर लग्नबंधनात अडकला मात्र २००२ साली दोघंही वेगळे झाले. रिना व आमिर यांना इरा व जुनैद अशी दोन मुलं आहेत. इरा गेल्या वर्षी नूपुर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकली. इरा एका हेल्थ सपोर्ट ऑर्गनायजेशनची संस्थापिका आहे. मानसिक आरोग्याबद्दल ती लोकांना सावध करते. नुकतेच तिने आमिर व रिना यांच्या नात्यावर भाष्य केले आहे. (ira khan on aamir khan divorce)
इराने नुकताच ‘पिंकविला’बरोबर संवाद साधला. यामध्ये तिने आमिर व रिना यांच्या घटस्फोटाचा मनावर काय परिणाम झाला? याबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली की, “दोघांनी आमच्यासमोर कधीही भांडण केले नाही. त्यांनी नेहमी मुलांसाठी एकत्रित काम केले. आमच्यापासून भांडणं नेहमी लांब ठेवली. सर्व बाबतीत त्यांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला. एक कुटुंबं म्हणून ते नेहमी एकमेकांवर प्रेम करत होते”.
पुढे इरा म्हणाली की, “आई-बाबांच्या घटस्फोटाचा माझ्यावर तसा काही जास्त परिणाम झाला नाही. मी मोठी झाले तेव्हा मला वाटलं की हे नातं चांगल्यासाठीच संपलं असावं. सत्यामुळे त्यामुळे एक इतकं आम्ही दु:ख वाटून घेतलं नाही”. आमिर व रिना यांच्या घटस्फोटाचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम झाला? यावर इरा म्हणाली की, “मी माझ्या डॉक्टरबरोबर या सगळ्यावर चर्चा केली. त्यावेळी मी शिकले की कोणालाही दोष देण्याची गरज नाही. जे झालं ते स्वीकारलं पाहिजे. माझ्या पालकांनी आम्हाला काहीही त्रास होऊ नये यासाठी खूप चांगले काम केले. ते जरी वेगळे झाले असले तरीही एक कुटुंबं म्हणून आम्ही अनेकदा एकत्र येतो”.
आमिर व रिना १९८६ साली लग्नबंधनात अडकले होते. लग्नाच्या १६ वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आमिरने किरण रावबरोबर लग्नगांठ बांधली. मात्र २०२१ साली तेही वेगळे झाले.