भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खूप खालावली होती. त्यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची काल रात्री प्राणज्योत मालवली. बुधवारी रात्री उशिरा त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर मनोरंजन तसेच सर्वच स्तरातील दिग्गजांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव नरीमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA)येथे ठेवले होते. या ठिकाणी सगळ्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी उपस्थित असणाऱ्यांच्या भावना दाटून आल्याचेही दिसून आले. (aamir khan tribute to ratan tata)
दिवंगत रतन टाटा यांनी निधनाच्या काही दिवस आधी सोशल मीडियावर त्यांच्या तब्येतीबद्दलची एक पोस्ट केली होती. सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “रुग्णालयात भरती होण्याबद्दल कोणतेह अंदाज बांधू नयेत. तसेच वयानुसार सगळ्या तपासणी करण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो”. अशातच त्यांच्या अंतिम दर्शनाचे फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार उपस्थित असलेले दिसून येत आहेत.
‘ANI’ने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, यामध्ये अभिनेता आमिर खान व त्याची पूर्व पत्नी किरण राव दिसून येत आहेत. दोघंही त्यांच्या पार्थिवासमोर हात जोडून उभे असलेले दिसत असून भावुकदेखील झाले आहेत. आमिरने वाकून रतन टाटा यांना अभिवादन केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रतन टाटा यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांच्या आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर त्यांच्या आजी आजोबांनी दत्तक घेतले होते. त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ओग आर्किटेक्चरमधून पदवी प्राप्त केली होती. १९६१ साली त्यांनी व्यवसायामध्ये पाऊल ठेवले. पुढे त्यांनी काम करत टाटाच्या १०० हून अधिक कंपन्या सुरु केल्या आहेत. तसेच संपूर्ण देशभरात त्यांची खूप लोकप्रियता होती.