‘बिग बॉस मराठी’चं पाचवं सध्या खूप गाजत आहे. यामधील सर्व सदस्य हे चर्चेत राहिले आहेत. मात्र हा कार्यक्रम १०० दिवसांऐवजी ७० दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या ६ ऑक्टोबर रोजी महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे आता विजेता कोण असणार? याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे. आतापर्यंत या कार्यक्रमामध्ये अनेक ट्विस्टदेखील आले. मात्र हा कार्यक्रम एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. यामध्ये सध्या फॅमिली स्पेशल एपिसोड सुरु आहे. गुरुवारी पार पडलेल्या भागात अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार यांच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. त्यांची कुटुंबियांबरोबर झालेली भेट खूप भावुक असलेली देखील दिसून आली. (suraj chavan viral video)
आजच्या भागाचे काही प्रोमो समोर आले आहेत. यामध्ये अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, पंढरीनाथ कांबळे व निक्की तांबोळी यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. अशातच आता सूरजचे कुटुंबीय घरात भेट देणार आहेत. हा प्रोमो नुकताच समोर आला आहे. यामध्ये सूरजला भेटण्यासाठी त्याच्या बहिणी व आत्या आल्या आहेत. ‘कलर्स मराठी’ने नुकताच हा भावुक करणारा वव्हिडीओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ समोर येताच सूरजच्या चाहत्यांनी प्रेम व्यक्त केले आहे. तसेच अनेकांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “इतकी साधी माणसं आहेत, त्या सर्वांनी घरात जाण्याच्या आधी चपला काढल्या”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “आज महाराष्ट्र रडणार”, अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “तसा मी कधी रडत नाही. पण हे बघून डोळे कधी भरले हे कळलं पण नाही”, त्याचप्रमाणे अजून एकाने लिहिलं की, “सर्वसामान्यांना संधी दिल्याबद्दल कलर्स मराठी व ‘बिग बॉस’चे आम्ही आभारी आहोत”, तसेच अजून एकाने लिहिले की, “सूरज तू खूप काही मिळवलंस, फक्त आई-वडील नाहीत हे सुख पाहायला. खरच खूप पुण्यवान असतील तुझे आई-वडील. असाच यशस्वी हो”.
दरम्यान आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वांचेच लक्ष वेधले गेले. सूरजच्या बहिणी व आत्या यांनी घरात येण्याआधी चपला घराच्या बाहेर काढल्यामुळे त्यांचे खूप कौतुक करण्यात आले आहे.