Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदाचा सीझन केवळ ७० दिवसांत संपणार आहे. याची अधिकृत घोषणा नुकतीच ‘बिग बॉस’कडून करण्यात आली आहे. आता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये या खेळात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या शोमधील प्रत्येक सदस्याची चर्चा होत आहे. एकूण दहा आठवडे हे पर्व सुरू राहील त्यानंतर ६ ऑक्टोबर हा शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. अशातच नुकताच घरातील सदस्यांना सांगकाम्या व मालक हा टास्क देण्यात आला आणि यात निक्कीच्या टीमने बाजी मारली असून त्या टीममधील वर्षा, सूरज व डीपी हे मालक झाले.
नुकत्याच झालेल्या भागात निक्की व जान्हवी यांनी वर्षा यांचे पाय चेपले होते. जान्हवी सांगकाम्या असल्यामुळे ती वर्षा यांची सगळी कामे करत आहे. टास्क हरल्यामुळे जान्हवीवर ही वेळ आली असून ती हा टास्क उत्तम निभावत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र ‘बिग बॉस मराठी’मधून बाहेर गेल्यावर जान्हवीला वर्षा यांच्याकडून काही काम मिळणार असल्यामुळे ती हे करत असल्याचे वाटत आहे. अशातच आजच्या भागाचा एक खास व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात जान्हवी याबद्दल निक्कीला टोमणा मारणार आहे. सोशल मीडियावर जान्हवी व वर्षा यांच्या संभाषणाचा खास व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये जान्हवी वर्षा यांना असं म्हणते की, “ताई तुमचं मोठं प्रॉडक्शन हाऊस (निर्मिती संस्था) आहे का?”. यावर वर्षा असं म्हणतात की, “हो… मिस्टरांचं आहे पण मोठं नाही”. यानंतर जान्हवी असं म्हणते की, “तुम्ही मला हीरोईन म्हणून काम देणार आहात का? मालिकांमध्ये वगैरे अभिनेत्री तुम्ही मला ब्रेक देणार आहात? मी तुमची सेवा करते आहे, त्यामुळे मला वाटतं की, तुम्ही मला इथून बाहेर गेल्यावर इंडस्ट्रीमध्ये काम देणार आहात”. यावर वर्षा तिला असं म्हणतात की, “तुला काम देण्याची काय गरज आहे”.
यापुढे जान्हवी असं म्हणते की, “लोकांना वाटतं की, तुम्ही मला बाहेर जाऊन कदाचित काम देणार आहात म्हणून मी तुमची सेवा करत आहे. तोंडावर बोलायची हिंमत नाही म्हणून माणसे नसताना मागे बोलतात”. जान्हवीचे हे बोलणे ऐकून निक्कीही “बिग बॉस ही पकवत आहे” असं म्हणते. त्यामुळे आता यावर जान्हवी व निक्की यांचे वाजणार का? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.