मुंबईत घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण मेहनतदेखील घेत असतो. काहींच्या बाबतीत ही स्वप्नपूर्ती होते तर काहींना यासाठी वेळ लागतो. मात्र गेल्या काही दिवसांत मराठीतील अनेक कलाकारांनी मुंबईत घर घेत त्यांची स्वप्नपूर्ती केली आहे. रुचिता जाधव, पृथ्वीक प्रताप, सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी यांनी नवं घर घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती. अशातच ‘बिग बॉस मराठी ४’ चा विजेता व अभिनेता अक्षय केळकरनेही मुंबईत त्याचं स्वत:चं नवीन घर घेतलं. सोशल मीडियावर याचा खास व्हिडीओ शेअर करत त्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. (Akshay Kelkar On Instagram)
या व्हिडीओमधून त्याने नवीन घराची झलक दाखवली होती. ’माझं मुंबईतील पहिलं घर’ असं म्हणत त्याने हा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. “२०२३ मध्ये सगळ्या सुंदर गोष्टी आयुष्यात घडल्या, त्यातली खूप सुंदर व अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुंबईत माझं स्वतःच घर. काही वर्षांपूर्वी जेव्हा या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या ५ मित्रांबरोबर म्हाडाच्या बिल्डींगमध्ये रूम शेअर करून भाड्याने राहत होतो. त्याच म्हाडाच्या मुंबईच्या प्रकल्पामध्ये यावर्षी अर्ज केला होता आणि सोडतीमध्ये विजेता ठरलो” असं म्हणत त्याने त्याच्या नवीन घराची खास झलक शेअर केली होती. अशातच त्याने आणखी एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये त्याने चाहत्यांबरोबर नवीन घराच्या गृहप्रवेश पूजेचे खास क्षण शेअर केले आहेत.
अक्षयने आईच्या वाढदिवसाचे खास औचित्य साधत नवीन घरात प्रवेश केला आहे. आईच्या वाढदिवसानिमित्त त्याने नवीन घराची पूजा आयोजित केली होती. याचाच खास व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यात घराची पूजा होताना दिसत आहे. गृहप्रवेश केला जात आहे. त्याचबरोबर या व्हिडीओत त्याचे आई-बाबा व आजी-आजोबा गृहप्रवेश करताना दिसत आहे. या गृहप्रवेशानंतर संपूर्ण केळकर कुटुंबाने वाढदिवसनिमित्त केक कापत आईचा वाढदिवस साजरा केल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले आहे. या व्हिडीओखाली अक्षयच्या चाहत्यांसह कलाकार मंडळींनी त्याला नवीन घराबद्दल अभिनंदन करत त्याचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्याच्या आईलाही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, अक्षयने ‘बिग बॉस’च्या गेल्या पर्वाचे विजतेपद पटकावले होते. त्यानंतर तो कलर्स वाहिनी वरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात दिसला होता. या कार्यक्रमात त्याने सूत्रसंचालन करत प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. त्यानंतर आगामी काळात तो कोणता नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार? याची चाहते वाट पाहत आहेत.