‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा दिग्दर्शक म्हणजे प्रवीण तरडे. प्रवीण हे दिग्दर्शक असण्याबरोबरच लेखक व अभिनेतेदेखील आहेत. आजवर अनेक मराठी मालिका, नाटक, चित्रपट या माध्यमांतून त्यांनी प्रेक्षकांवर अभिनयाची छाप सोडली आहे. त्याचबरोबर त्यांची पत्नी स्नेहल ही देखील मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहे. दोघांनी अनेकदा एकत्र चित्रपटात अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दोघेही त्यांच्या अभिनयाने कायमच चर्चेत असतात. अशातच ही जोडी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आणि याचं कारण म्हणजे स्नेहल तरडेनी सोशल मीडियावर शेअर केलेला खास व्हिडीओ. (Snehal Tarade On Instagram)
स्नेहल ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिच्या कामाची माहिती किंवा तिचे काही खास फोटो शेअर करत असते. अशातच तिने शेअर केलेल्या एका खास व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. स्नेहलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. स्नेहलने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण तरडे यांच्याबरोबरचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. दोघांच्या लग्नाचा १४व्या वाढदिवसानिमित्त स्नेहलने प्रवीण यांना खास सरप्राइज देत शुभेच्छा दिल्या आहेत.
स्नेहलने लग्नाच्या १४ व्या वाढदिवसानिमित्त खास ‘कपलडेट’ आयोजित केली होती. याचा व्हिडीओ शेअर करत तिने असं म्हटल आहे की, “आमच्या लग्नाच्या १४ व्या वाढदिवसानिमित्त मी प्रवीणला समुद्रकिनारी खास जेवणाचा बेत करत त्याला सरप्राइज द्यायचे ठरवले आणि याची त्याला अजिबातच कल्पना नव्हती. त्यामुळे तोही हे सगळं पाहून आश्चर्यचकित झाला.” त्याचबरोबर या व्हिडीओमध्ये प्रवीण स्नेहलला गुलाब व अंगठी देत हा क्षण आणखी खास करतात. त्यामुळे या भेटवस्तू स्वीकारत या व्हिडीओमध्ये स्नेहलने पुढे असं म्हटले आहे की, “प्रत्येक नातं हे महागड्या भेटवस्तूंबद्दल नसून आपला प्रियकर आपल्यासाठी किती खास आहे याबाबत असतं”
आणखी वाचा – लग्नानंतर पियुष-सुरुची यांच्या रिसेप्शन सोहळ्याचे फोटो व्हायरल, डिझायनर गाऊनमध्ये दिसली नवी नवरी
या व्हिडीओच्या खाली कॅप्शनमध्ये स्नेहलने “प्रिय प्रवीण, तु कायम स्पेशल आहेस याची जाणीव करुन देण्यासाठी मी कायम प्रयत्न करेन” असं लिहिलं आहे. त्याचबरोबर या व्हिडीओत त्यांनी एकमेकांना खास भेटवस्तू देत मिठी मारली आणि त्यानंतर आकाशात दिव्याचे कंदील सोडत त्यांचा लग्नाचा १४वा वाढदिवस खास बनवला. दरम्यान, या खास व्हिडीओखाली मराठीतील कलाकारांसह चाहत्यांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.