प्रत्येक श्रावणातल्या पहिल्या श्रावणी सोमवाराला अभिनेते अशोक सराफ गाठायचे सचिन पिळगांवकरांचं घर, याबाबद्दलचा किस्सा अशोक मामांनी त्यांच्या ‘मी बहुरूपी’ पुस्तकात सांगितला आहे. नेमका काय आहे तो किस्सा जाणून घ्या आजच्या ‘जपलं ते आपलं’मध्ये. सिनेसृष्टीतील एक काळ गाजवणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे या कलाकारांची नाव आवर्जून घेता येतील. (Ashok Saraf on Sachin Pilgaonkar)
दर्जेदार विनोदी चित्रपट, आशयघन कथानक असलेल्या चित्रपटांमध्ये या कलाकारांपैकी एक तरी कलाकार असणार नाही, असं होणं क्वचितच. यादरम्यान अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ यांची कामानिमित्त चांगलीच गट्टी जमली होती. ही गट्टी इतकी घट्ट होत गेली की, त्यांचे संबंध ही त्यांच्या घरपर्यंत घट्ट झाले. याबाबतचा एक किस्सा अशोक सराफ यांनी त्यांच्या ‘मी बहुरूपी’ या पुस्तकात सांगितला आहे, चला तर जाणून घेऊया काय आहे तो किस्सा आजच्या ‘जपलं ते आपलं’ या भागात.
पाहा अशोक सराफ का गाठायचे पिळगांवकरांचं घर (Ashok Saraf on Sachin Pilgaonkar)
सध्या श्रावण सुरु असून अधिक मास महिन्याची ही यांत भर पडली आहे. हे सगळं बोलण्याचं कारण म्हणजे अशोक मामांनी श्रावणातील एक किस्सा सांगितला आहे जो ऐकून सचिन आणि अशोक यांच्यात मैत्रीचं नातं किती घट्ट आहे, याबाबतचा उलगडा होतोय. श्रावणी सोमवारचा एक किस्सा अशोक मामांनी त्यांच्या ‘मी बहुरूपी’ या पुस्तकात लिहून ठेवला आहे. अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर यांनी ‘बनवाबनवी’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘माझा पती करोडपती’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं.
चित्रपटात काम करता करता त्यांच्यातील मैत्री ही वाढत गेली. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “कामाच्या निमित्तानं सचिन आणि मी एकत्र आलो. आणि एकमेकांना ओळखू लागल्यानंतर आम्ही मित्र बनलो. त्यानंतर मैत्री वाढत गेली आणि मग मी त्यांच्या घरचा झालो”. सचिन यांचे वडील असताना श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी अशोक मामा उपवास सोडायला सचिन यांच्या घरी न चुकता जात”.
याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, “‘पपा असताना मी सचिनच्या घरी प्रत्येक सोमवारी उपवास सोडायला जायचो. तो एक रिवाजच बनून गेला होता. पपा गेल्यानंतरच्या पहिल्या श्रावणी सोमवारी सचिनच्या आईनं आवर्जून मला फोन करून बोलावून घेतलं आणि त्यात खंड पडू दिला नाही. त्यामुळे आम्हा दोघांच्या कुटुंबांमध्येही तो जिव्हाळा झिरपला नसता तरच नवल. हे नातं आता आयुष्यभरासाठीचं आहे”. असं म्हणत मामांनी श्रावणी सोमवारचा आणि त्यांच्या आणि सचिन पिळगांवकर यांच्या मैत्रीचा किस्सा सांगितला.