Sunny Deol on Bollywood : अल्पावधीतच ‘गदर २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. तीन दिवसांत गदर चित्रपटाने १३४ करोडहून अधिक कमाई केली आहे. २००१ साली प्रदर्शित झालेला ‘गदर : एक प्रेमकथा’ चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले, तेव्हापासून चाहते या चित्रपटाच्या सिक्वेलची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. अशातच तब्बल २२ वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून सनी देओलने तो यापुढे असेच चित्रपट तयार करणार असल्याचं स्पष्ट केलं. सोबत बॉलिवूड चित्रपट असं म्हणण्याऐवजी आपण यांना हिंदी चित्रपटचं म्हणायला हवं, असं वक्तव्य करत त्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘गदर २’च्या यशानिमित्त नुकतीच एक पत्रकार परिषद ठेवण्यात आली होती. दिग्दर्शक अनिल शर्मा व इतर कलाकारांसह सनी देओलही यावेळी उपस्थित होता. पत्रकार परिषद सुरु असताना तिथे कोणीतरी बॉलिवूड हा शब्द वापरला, त्याचवेळी त्याने त्या व्यक्तीला अडवत म्हटलं, “आम्ही हिंदी चित्रपट बनवतो. आपल्याला हिंदी असल्याचा अभिमान असायला हवा. फक्त हॉलिवूड आहे याचा अर्थ असा नाही की आपण स्वतःला हॉलिवूड म्हणावं. ही हिंदी चित्रपटसृष्टी आहे, हिंदी सिनेमा आहे. तुम्ही कोण आहात म्हणून घाबरू नका. हिंदुस्थान जिंदाबाद आहे आणि तसाच राहील”.
आपल्या देशात होणाऱ्या चित्रपटसृष्टीतील भेदभावावरून सनी देओल याने आक्षेप घेत भाष्य केलं. “‘मासी फिल्म्स’ म्हणजेच जनसमुहवाले सिनेमे. तो म्हणाला, ‘मासी म्हणजे काय? तर म्हणजे सार्वजनिक. आपण सर्व सार्वजनिक आहोत. आपण जनतेला का कमी करत आहोत? आम्ही असे म्हणत आहोत का, की इतर लोक आहेत जे उच्च स्तरावर आहेत? अशा प्रकारे जनतेपासून स्वतःला वेगळं करण्याची आपली मानसिकता नाही. भारत म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. आपल्याकडे खूप कला आणि संस्कृती आहे. संपूर्ण जग आपली कला चोरून पुढे गेले आहे. आपल्या कला आणि संस्कृतीचा अभिमान बाळगण्याऐवजी आपण पाश्चिमात्य देशांची नक्कल करत आहोत”.
यापुढे बोलताना सनी देओल म्हणाला, “आपण असं काहीतरी बनवलं पाहिजे जे आपल्या संस्कृतीतून थेट येतं. आपण फक्त स्वतःची कॉपी केली पाहिजे, इतर देशांची नाही. मला वाटतं, आत्तापर्यंत सर्वांना माहीत आहे की माझे वडील व आमचे कुटुंब आमच्या मुळाशी आणि संस्कृतीशी किती जोडले गेले आहोत”.