मराठी प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहांमध्ये मनोरंनाची मेजवानी असल्याची पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चित्रपटगृहात अनेक दर्जेदार चित्रपट दाखल झाले आहेत. १ मे रोजी अभिनेत्री मुक्ता बर्वे व नम्रता संभेराव यांचा ‘नाच गं घुमा’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा होती. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाच्याबरोबर ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. या चित्रपटालादेखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. तर महेश मांजरेकर यांचा ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.
Sacnilkच्या वृत्तानुसार महेश मांजरेकरांच्या ‘जुनं फर्निचर’ने पहिल्या दिवशी ३८ लाख, तर दुसऱ्या दिवशी ७२ लाख रुपयांची कमाई करत तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने १ करोडचा टप्पा पार केला. त्यानंतर चौथ्या व पाचव्या दिवशी अनुक्रमे ३५ व ४४ लाखांची कामी केली. यानंतर सहाव्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७९ लाखांची मजल मारली. अशाप्रकारे ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची ६ दिवसांची एकूण कमाई ही ३.७ करोड इतकी आहे.
तर परेश मोकाशी यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘नाच गं घुमा’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून सर्वच प्रसार माध्यमांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २.१५ कोटी, दुसऱ्या दिवशी ८० लाख, तिसऱ्या दिवशी ९५ लाखांची कमाई केली. तर गेल्या वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत चांगलीच भर पडली. वीकेंडला या चित्रपटाने ३.९० कोटी कमावले असून पाच दिवसांची एकूण कमाई ही ५.७५ इतकी आहे.
दरम्यान, नाच गं घुमा या चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेरावसह सुप्रिया पाठारे, सुकन्या मोने व मायरा वायकुळ यांच्यासह सारंग साठ्ये यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर स्वप्नील जोशी व शर्मिष्ठा राऊत यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.