‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाने जवळपास दोन महिन्यांसाठी ब्रेक घेतला होता. यादरम्यान या कार्यक्रमातील कलाकार परदेशात गेले होते. परदेशात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे काही शो झाले. तिथेही या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आता पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रेक्षकांना हसवण्यास तयार झाली आहे. कार्यक्रमातील कलाकारांना पाहून प्रेक्षकही आनंदी झाले आहेत. आता यामधीलच एका कलाकाराची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगत आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे विनोदी कलाकारांना एक वेगळी ओळख मिळाली. त्यापैकीच एक कलाकार म्हणजे गौरव मोरे. गौरव मंचावर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांना खळखळून हसवतो. आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात तो यशस्वी ठरला. त्याच्या केसांची स्टाइल तर आता जगप्रसिद्ध झाली आहे. पण आता गौरवची ही स्टाइल प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही. कारण त्याने स्वतः केस कापले आहेत. त्याचा नवा लूक आता समोर आला आहे.
समीर चौघुलेंनी गौरवचा नव्या लूकमधील फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केला. हा फोटो पाहून त्याच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. गौरवचे केस यामध्ये कापलेले दिसत आहे. तसेच त्याच्या कानामध्ये बाळी दिसत आहे. समीर यांनी हा फोटो शेअर करत म्हटलं की, “आमच्या हास्यजत्रेत नवीन अभिनेत्याचे पदार्पण”.
समीर यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एमएचजे टीम असताना गौरवच्या केसाला धक्का कोणी लावला?, गौरवरचे कान पहिल्यांदा पाहिले, गौरवने केस का कापले?, म्हणजे तुम्हाला स्किटसाठी विषय मिळाला, माणसात आल्यासारखा वाटतो अशा विविध कमेंट चाहत्यांनी केल्या. आता गौरव स्किटमध्ये केस उडवताना दिसणार नसल्याची चाहत्यांना खंत आहे. पण त्याचा हा नवीन लूक व नवी भूमिका पाहणं तितकंच रंजक ठरणार हे नक्की.