मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार २०२३ हा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना देत गौरविले आहे. अशोक सराफ यांच्या मनोरंजन सृष्टीतील भरीव योगदानासाठी यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देत त्यांना सन्मानित करण्यात आलं. यावरून सर्वच स्तरातून अशोक सराफ यांचं कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. अशातच हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर नेमकी कशी भावना आहे याबाबत इट्स मज्जासह बोलताना अशोक सराफ भावुक झालेले पाहायला मिळाले. (Ashok Saraf Emotional)
अशोक सराफ प्रतिक्रिया देत म्हणाले, “आपण जे करायचं ठरवलं होतं त्यात आपण कुठेतरी यशस्वी होत जातो हे जाणवणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मला हा पुरस्कार मिळेल असं वाटलं नव्हतं, पण मी केलेलं हे कुठेतरी लोकांच्या मनात रुजू होत होतं. आणि ही सेवा आज सरकार दरबारी रुजू झाली आहे हे मला जास्त महत्त्वाचं वाटत आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिला फोन आला. त्यानंतर मग सुधीरराव मुनगंटीवार यांचा फोन आला. दोघांचाही मी आभारी आहे. त्यांनी यासाठी भरपूर प्रयत्न केले. निवड समिती मार्फत माझा या पुरस्कारासाठी विचार केला, हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. कलाकार नेहमीच काम करत असतो. ते कितपत यशस्वी होतंय, कोणाला आवडतंय याचे नुसते ठोकताळे बांधत असतो. पण असा एखादा सत्कार करून तुम्ही आम्हाला आमच्या कामाची जाणीव करुन देता, आम्हाला आमच्या कामाची पोचपावती देता”.
पुढे अशोक सराफ म्हणाले, “हा पुरस्कार मिळाल्यानंतर कशा पद्धतीने प्रतिक्रिया द्यावी हेच मला कळत नव्हतं. मी महाराष्ट्राचा आहे, ही माझी कर्मभूमी, जन्मभूमी आहे त्या महाराष्ट्राचा हा नंबर वनचा पुरस्कार मी मानतो. हा पुरस्कार मला मिळाला ही खूप मोठी गोष्ट आहे. आतापर्यंत हा पुरस्कार ज्या लोकांना मिळाला आहे ती दिग्गज मंडळी आहेत. आणि त्या दिग्गज मंडळींमध्ये मला आज नेऊन बसवलं आहे हे माझ्या दृष्टीने कायम लक्षात राहणारी गोष्ट आहे. आनंद होणं साहाजिक आहे, पण हा वेगळाच आनंद देणारा क्षण आहे”.
रसिकांच्या प्रेमाबाबत बोलताना ते म्हणाले, “जेव्हा असं कौतुक होतं, जेव्हा पुरस्कार मिळतात तेव्हा रसिकांसाठी आणखी काही करण्याची जबाबदारी नकळत वाढते. दरवेळेला ही जबाबदारी वाढते हे तुम्ही कसं मान्य करता तेही महत्त्वाचं आहे. मला नेहमीच असं वाटतं की, आपल्यावर प्रेक्षक एवढं प्रेम करतात तर आपण त्यांच्यासाठी नेहमीच काहीतरी खास करायला हवं. जबाबदरी आपणच वाढवून घेणं हे कलाकाराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही एखाद्याचा सत्कार करता, पुरस्कार देता तेव्हा त्या व्यक्तीची जबाबदारी वाढवत असता. आणि ही माझी जबाबदारी वाढली आहे असं मी मानतो. मी सर्व महाराष्ट्रीयन प्रेक्षकांना व महाराष्ट्रातील अमराठी प्रेक्षकांना अभिवादन करतो की, माझं केलेलं कौतुक, व मला दिलेला पुरस्कार त्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे” असं म्हणत त्यांनी आभार व्यक्त केले.