‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या रिऍलिटी शोमुळे जुईली जोगळेकर व रोहित राऊत ही जोडी चर्चेत आली. सुरुवातीला जुईली व रोहित यांचं असलेलं मैत्रीपूर्व नात्याचं रूपांतर झालं आणि दोघांनी लग्नगाठ बांधली. बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रोहित व जुईली यांनी २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. अगदी शाही थाटामाटात ही जोडी विवाहबंधनात अडकली. मात्र लग्नाआधी ही जोडी काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. नुकत्याच सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत याबाबत या जोडप्याने खुलासा केला आहे. (Juilee Jogalekar And Rohit Raut On Live in Relationship)
याबाबत बोलताना रोहित म्हणाला, “तू अशी असशील असं मला वाटलं नव्हतं किंवा तू आता असं वागशील असं मला वाटलं नव्हतं. हे सगळं बोलण्यापेक्षा तुम्ही आधीच एकमेकांबरोबर राहून अनुभव घ्या. आणि तेव्हाच ठरवा आपण एकमेकांना किती ओळखतो, एकमेकांना किती समजून घेतो. लग्नानंतर प्रत्येक मुलीप्रमाणे मुलाचं आयुष्य सुद्धा बदलतं. आधी आपण एकटं राहिलेलो असतो आणि अचानक आपली रुम कोणीतरी शेअर करणार असतं. सगळ्याच गोष्टी अर्ध्या अर्ध्या होऊन त्या बायकोबरोबर शेअर कराव्या लागणार आहेत. आम्ही दोघंही एकमेकांशी याबाबतीत बोललो आणि मग विचार केला. आपण असं लिव्ह इनमध्ये राहुया का? घरच्यांशी बोलुया का? किंवा असं राहिलेलं आमच्या घरी चालेल का? जर त्यांना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं हे तत्त्वांच्या बाहेर वाटत असेल तर आम्ही आणखी काहीतरी मार्ग पाहतो असं सगळं आम्ही ठरवलं होतं”.
यावर जुईली म्हणाली, “आम्ही एकत्र तीन वर्षे लिव्ह इनमध्ये राहिलो. लग्नाचं ठरल्यावर आम्हाला बाबांनी विचारलं की, तुम्ही अजून किती वर्ष घेणार आहात तर, आम्ही त्यांना आम्हाला पूर्णपणे सेट व्हायला तीन वर्षे तरी लागतील असं सांगितलं होतं. त्यामुळे या काळात तुम्ही कोणीही लग्नाचा विचार करु नका आम्हाला आमचा वेळ घेऊदेत असं आम्ही घरी सांगितलं होतं. जर त्या ३ वर्षात आम्ही नीट नाही वागलो, आमच्याकडून काही घडलं नाही तर, निश्चितच आम्हाला बोला आम्ही तेव्हा तुमचं सगळं ऐकून घेऊ. आम्ही त्यांच्याशी हे स्पष्टपणे बोललो तेव्हा आमच्या आईबाबांनी असा विचार केला की हे जे सांगत आहेत त्यात तथ्य आहे. यांचा यामागचा विचार चांगला आहे”.
“आम्ही लिव्ह इनमध्ये राहिलो यात सर्वात मोठा वाटा आमच्या आई-बाबांचा होता. त्यांनी खूप साथ दिली. कारण, आमच्या आई-बाबांनी खूप मोठा विचार केला. जर, त्यांनी आमची मतं, विचार समजून घेतले नसते, तर कदाचित आज आम्ही एवढे आनंदी राहू शकलो नसतो. रोहितच्या बाबांनी, माझ्या आई-बाबांनी खरंच आम्हाला खूप समजून घेतलं, पाठिंबा दिला. लॉकडाऊन लागल्यावर आम्ही एकमेकांची कशी काळजी घेतो, कसे भांडतो हे सगळं आम्हाला समजलं पाहिजे असा विचार आमच्या कुटुंबीयांनी केला. एकमेकांनाच राग आला आणि तो २४ तास राहिला असेल तर ते लोक कसे त्याकडे बघतात आणि तो प्रश्न सोडवतात. हा विचार माझ्या पालकांनी केला. पालक आपल्या मुलांना फक्त २-३ तासांसाठी पार्टनरला भेटायला बाहेर सोडतात पण, त्या काळात आपल्याला संबंधित व्यक्ती पूर्णपणे ओळखता येत नाही. यापेक्षा २४ तास एकत्र राहिल्यावरच या गोष्टी कळतात”.