मराठी सिनेसृष्टीतील सुशील, मनमोहक, सोज्वळ अशी अभिनेत्री म्हणजे दीपा परब. अभिनेत्री दीपा परब हिने आजवर तिच्या अभिनयशैलीने आणि तिच्या निरागस स्वभावाने चाहत्यांच्या मनात कायमच घर केलं. लग्नांनंतर अनेक काळ दीपाने मात्र सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला होता. अशातच आता तिने पुन्हा एकदा सिनेसृष्टीत जोरदार असं कमबॅक केलं आहे. तिच्या अभिनयाची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत होते. आता प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला दीपा पुन्हा एकदा मोठ्या उत्साहाने सिनेमाविश्वात रुजू झाली आहे. (Deepa Parab On Award)
सध्या दीपा ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेतून घराघरांत पोहोचली आहे. या मालिकेतील अश्विनीच्या भूमिकेतून ती समोर आली. ’तू चाल पुढं’ या मालिकेला तसेच अश्विनी या भूमिकेला कमी कालावधीत प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. याशिवाय आताच्या एका ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे दीपाला लोकप्रियता मिळाली. ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट अल्पावधीतच बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटात दीपाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. चित्रपटातील तिच्या भूमिकेचं, तिच्या अभिनयाचं सर्वच स्तरातून कौतुक ही करण्यात आलं.
दीपा सोशल मीडियावरून नेहमीच काही ना काही शेअर करत असते. अशातच दीपाने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओमध्ये दीपाला पुरस्कार मिळालेला पाहायला मिळतोय. हा पुरस्कार दीपासाठी खूप खास आहे. कारण हा पुरस्कार तिला तिच्या माहेरहून म्हणजेच कोकणातून मिळाला आहे. ‘कोकण रत्न’ पुरस्काराने दीपाला सन्मानित करण्यात आलं आहे. दीपा मूळची कोकणातली आहे. कोकणकन्या म्हणून ती नेहमीच मिरवत असते. कोकणाविषयी दीपाला खूप प्रेम, आपुलकी असलेली पाहायला मिळते. याच कोकणाकडून दीपाला भरभरून प्रेम देत तिचा सन्मान करण्यात आला आहे.
दीपाने ‘कोकण रत्न’ पुरस्कार स्वीकारत शेअर केलेल्या फोटोखालील कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “मी आज खूप खूश आसय कारण माझ्या माहेरसून (कोकणातून) ह्यो ‘कोकण रत्न’ पुरस्कार माका मिळालो हा. तुमच्या सगळ्या मायबाप प्रेक्षकांचा असाच प्रेम कायम माझ्या पाठीशी रवांदेत ह्याच देवाकडे मागणा आसा.” असं मालवणी भाषेत तिने लिहिलेल्या कॅप्शनने अनेकांची मन जिंकली आहेत. तिच्या या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसतोय.