‘झी मराठी’ वाहिनी गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांचं मनसोक्त मनोरंजन करण्यात व्यस्त आहे. आजवर या वाहिनीने आशयघन विषय, विनोदी विषय हाताळत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. गेली दहा वर्षे प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करणारा एक कार्यक्रम निरोप घेणार असल्याची बातमी समोर आली आहे. काही दिवसांतच ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाची सांगता होणार आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात या कार्यक्रमाचं चित्रीकरण येऊन ठेपलं आहे. काही वर्षांपासून या कार्यक्रमाने टीआरपीचा तळ गाठला असल्याकारणाने हा कार्यक्रम बंद होणार असल्याचं समोरं आलं आहे. (Zee Marathi New Promo)
‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम बंद होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. हीच नाराजी दूर करण्यासाठी ‘झी मराठी’ वाहिनी लवकरच एका नव्या कार्यक्रमासह सज्ज होणार आहे. या नव्या कार्यक्रमाचे प्रोमो समोर आले आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या कार्यक्रमाचे प्रोमो शेअर करण्यात आले आहेत. ‘करणार तेव्हा कळणार, आता मज्जा येणार…लवकरच खेळ सुरू होणार, झी मराठीवर… ‘असं कॅप्शन देत त्यांनी नवे प्रोमो शेअर केले आहेत.
‘झी मराठी’ वाहिनीने हे शेअर केलेले दोन नवे प्रोमो पाहता, नेटकऱ्यांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहीलं आहे, “आम्ही उत्सुक आहोत. काय आहे?”. तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की, “‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ बंद होणार आहेत. रात्री ९ ते १० मध्ये तीन मालिका डिसेंबर महिन्यात ‘झी मराठी’वर भेटीला येणार आहे.” तर अनेकांनी अमोल कोल्हे मुख्य भूमिकेत असणार असल्याच्या कमेंट केल्या आहेत.
‘झी मराठी’ वाहिनी आता हा नवा कोणता खेळ प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची जागा आता हा नवा कार्यक्रम घेणार का? असा प्रश्नही चाहत्यांमध्ये पडला आहे. शिवाय या नव्या कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार याकडे ही साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.