‘बिग बॉस’ विजेता अक्षय केळकरने आजवर त्याच्या हटके स्टाईलने साऱ्या प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ‘बिग बॉस सिझन ४’ जिंकल्यानंतर अक्षयला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. याशिवाय अक्षयने ‘ढोलकीच्या तालावर’ या रिऍलिटी शोच्या निवदेनाची जबाबदारी पार पाडली. तसेच त्याच्या ‘दोन कटिंग’ या सीरिजनेही साऱ्यांच्या मनावर राज्य केलं. अक्षय सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतो. अशातच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. (Akshay Kelkar New Home)
अक्षयने चाहत्यांसह एक गुडन्यूज शेअर केली आहे. अक्षयने नुकतंच त्यांचं कळव्यातील राहतं घर सोडून नव्या घरात पदार्पण केलं आहे. मुंबईत त्याने नवं घर घेतलं असल्याची माहिती त्याची बहीण श्रद्धा हिने दिली आहे. अक्षय केळकरने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तो, त्याची आई आणि बहिण असे तिघेजण दिसत आहेत. त्यांच्या हातात काही बॅगाही पाहायला मिळत आहेत. बॅग हातात घेऊन काढलेला एक फोटो आणि त्यांच्या रिकाम्या घराचा फोटो शेअर करत “आम्हाला तुझी खूप आठवण येईल, पुन्हा एकदा शेवटचं, बाय कळवा घर” असं म्हटलं आहे.
या व्हिडीओला कॅप्शन देत त्याने “घर आठवणी”, असे म्हणत इमोजी शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. यातील एका चाहत्याने “आता कुठे जाणार”, असे विचारले आहे. त्यावर त्याची बहीण श्रद्धाने “मुंबई” असं म्हणत उत्तर दिलं आहे. तर एकाने त्यांना “तुम्ही कळव्याचं घर सोडलं का?” असे विचारले आहे. त्यावर श्रद्धाने “हो” असं म्हटलं आहे. अक्षयने नवं घर घेतल्याची हिंट याआधी दिलीच होती.
काही दिवसांपूर्वी अक्षयने बाप्पाचं चित्र रेखाटत कॅप्शन मध्ये लिहिलं होतं की, ““आता हे चित्र आयुष्यभर अशा ठिकाणी राहणार जिकडे मी आतापर्यंत बरंच काही पाहिलंय पण आता मात्र मी तिथे नसेन, बाप्पा मी तिथून जाणार आहे आणि तू तिथे असशील.” यावरूनच तो जुनं घर सोडणार असल्याचं कळलं होतं. त्यानंतर आता अधिकृतरीत्या त्याने ही बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. अक्षय केळकरने काही महिन्यांपूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरासाठी अर्ज केला होता. त्याने पहाडी गोरेगाव व मागाठाणेमधील घरांसाठी एकूण तीन अर्ज भरले होते.