नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने विक्रमी कमाई करत बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेला पात्र ठरत आहे. बॉबी देओल, रणबीर कपूर, रश्मिका मंदाना व अनिल कपूर यांच्या दमदार भूमिका असलेल्या चित्रपटात मराठी कलाकारांनीदेखील आपली एक वेगळी छाप उमटवली आहे. (Marathi Artist’s Apperance In Animal Movie)
चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर यांसह मराठीतील लोकप्रिय अभिनेता उपेंद्र लिमयेचीदेखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. एका आर्मी ऑफिसरच्या मुख्य भूमिकेतून उपेंद्रने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. चित्रपटातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर या अभिनेत्याची एण्ट्री होते आणि त्याच्या ‘चांगभलं’ या डायलॉगने तो चित्रपटगृहातील प्रेक्षकांची दाद मिळवतो. यात उपेंद्रचे मराठी भाषेतील अनेक संवाद आहेत. त्यामुळे संपूर्ण चित्रपटात उपेंद्रची अगदी छोटीसी भूमिका असली तरी तो चांगलाच भाव खाऊन गेला आहे असं म्हणायला हरकत नाही.
दुसरीकडे या चित्रपटात उपेंद्रसह अभिनेत्री मृण्मयी गोडबोले हिचीदेखील अगदी छोटी पण महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटात ती मानसोपचारतज्ञाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. तर प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांचाही या चित्रपटात मोलाचा वाटा आहे. चित्रपटात एका फाईट सीनमध्ये त्यांचं ‘डॉल्बीवाल्या बोलव माझ्या डीजेला’ हे गाणं ऐकु येतं आणि या गाण्याने मराठीसह हिंदी प्रेक्षकांचेही लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे एका मोठ्या हिंदी चित्रपटात मराठी गाणं वाजणं ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
दरम्यान, ‘अॅनिमल’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आदि कलाकारांसह मराठीतील उपेंद्र, मृण्मयी या मराठी कलाकारांनीही आपली वेगळी छाप उमटवली आहे. त्यामुळे मराठीतील या कलाकारांना मोठ्या पडद्यावर पाहणे ही मराठीसह हिंदी प्रेक्षकांसाठी देखील पर्वणी आहे.