सध्याच्या या डिजिटल युगात प्रत्येक जण सोशल मीडियावर असतो. आज प्रत्येक क्षेत्र हे सोशल मीडियाशी संबंधित आहे. यात मनोरंजन क्षेत्र हे तर बहुतांश सोशल मीडियावरवरच अवलंबून आहे. प्रत्येकजण फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवरसारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर करतात. मनोरंजन क्षेत्रातले तर बरेच कलाकार सोशल मीडियावर आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या, प्रेक्षकांच्या संपर्कात राहतात. आपल्या कामाची माहिती, अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर करत चाहत्यांना त्यांच्याविषयीची प्रत्येक अपडेट्स देत असतात. मात्र या सगळ्याला मराठीतील एक अभिनेते अपवाद आहेत, ते म्हणजे उपेंद्र लिमये. उपेंद्र हे सोशल मीडियावर कुठेच नाही. कोणत्याच सोशल मीडियावर त्यांचं अकाऊंट नाही. मात्र ते सोशल मीडियावर का नाहीत?, त्यांना सोशल मीडियाशी काही वैर आहे का? याचा स्वतः उपेंद्र यांनी खुलासा केला आहे.
‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या खास मुलाखतीच्या कार्यक्रमात अभिनेत्याने स्वतः सोशल मीडियावर नसण्यासंबंधित खुलासा केला आहे. ते यावेळी असं म्हणाले की, “सोशल मीडिया हे मला कृत्रिम वाटतं. त्यात उथळपणा असतो. एक चांगला नट होण्यासाठी तुमच्या संवेदना नेहमीच शाबूत असणे गरजेचे असते. माझ्या संवेदनांमध्ये जर उथळपणा आला तर तोच माझ्या अभिनयातूनसुद्धा येऊ शकतो. त्यामुळे माझ्या वाट्याला येणाऱ्या अनेक भूमिका ज्यात भावनांचा कस लागतो, त्या मला साकारतात येणार नाहीत. त्यामुळे माझ्यातला माणूस व कलाकार शाबूत रहावा म्हणून आणि माझ्यातल्या त्या संवेदना शाबूत राहण्यासाठी मी सोशल मीडियासारख्या कृत्रिम जगात येणं पसंत करत नाही. त्यामुळे मी फेसबुक, इन्स्टाग्राम कुठल्याच सारख्या सोशल मीडियावर नाही. कारण ते सगळं कृत्रिम आहे आणि ते तुम्हाला तुमच्या वास्तविक जगापासून लांब घेऊन जातं. त्याचबरोबर ते तुम्हाला त्याच्या जाळ्यात अडकवून ठेवतं. त्यामुळे मी बाकी सगळ्याचा विचार न करता फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतो.”
पुढे याच प्रश्नाचा धागा कायम ठेवत त्यांना “तुमचं सोशल मीडियाशी वैर आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत असं म्हणाले की, “अजिबातच नाही माझं सोशल मीडियाशी काहीही वैर नाही. सोशल मीडिया हे टिळक-आगरकरांसारखे आहे. म्हणजे ते ज्याप्रमाणे त्यांचं म्हणणं होतं की स्वातंत्र्य आधी पाहिजे की समाजसुधारणा? तसंच सोशल मीडिया वापरण्यासंबंधित आहे. म्हणजे आधी सोशल मीडिया वापरण्यासंबंधित शिक्षण दिलं पाहिजे मग तो सोशल मीडिया पाहिजे. आपल्याकडे सोशल मीडिया अगदी भस्मासुरासारखा आला. त्यामुळे त्याच्याकडे कसं बघायचं? तो वापरायचा कसा? त्याच्यातुन सकारात्मक गोष्टी कशा घेता येतील हे सांगितलं जाणं गरजेचं आहे. दुर्दैवाने सोशल मीडियावर ७०-८०% ट्रोलिंगच्या माध्यमातून विकृतीच होते. त्याचबरोबर घरात ज्यांना काडीची किंमत नसते ते सोशल मीडियावर वाघ म्हणून जगतात. अनेकजण खोटे सोशल मीडिया आयडी करून ट्रोल करतात त्यातही त्यांचा धाडसीपणा नसतो. त्यामुळे सोशल मीडियावर फक्त नकारात्मकच पसरली आहे. मग त्यात पडण्यापेक्षा इतर अनेक चांगल्या गोष्टी करण्यासाठी आहेत. माझी मुलं मला यासंबंधीत नेहमीच बोलत असतात. पण मी सोशल मीडियावर येईन की नाही मला माहित नाही. आणि आलोच तर ते मला झेपणारही नाही असं मला वाटतं. सोशल मीडियावर कोण तरी माणूस काहीतरी बोलणार. मग आपण त्याचा स्वतःला त्रास करून घेणार आणि मग मी नकारात्मक होणार. त्यापेक्षा मी माझ्या कामावर लक्ष देणं पसंत करतो.
दरम्यान, आताच्या डिजिटल युगात सोशल मीडियावरील नकारात्मकता व ट्रोलिंगमुळे उपेंद्र लिमये सोशल मीडियावर नसल्याचे त्यांनी सांगितले. पण भविष्यात ते सोशल मीडियावर येऊ शकतात अशी पुसटशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. सध्या त्यांचा ‘अॅनिमल’मधील फ्रेडी हा चांगलाच गाजत असून त्यांच्या भूमिकेला मराठीसह हिंदी प्रेक्षकही चांगलीच दाद देत आहेत. त्यामुळे आता येत्या आगामी काळात ते कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतात, यासाठी त्याचे चाहते कमालीचे उत्सुक आहेत.