नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने विक्रमी कमाई करत बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आणि अजूनही हा चित्रपट चांगलाच गाजत आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती आणि आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेला पात्र ठरत आहे. बॉबी देओल, रणबीर कपूर, रश्मिका मंदाना व अनिल कपूर यांच्या दमदार भूमिका असलेल्या चित्रपटात मराठी कलाकारांनीदेखील आपली एक वेगळी छाप उमटवली आहे. यात अभिनेता उपेंद्र लिमये हे पाहुणे कलाकार म्हणून असले तरी चित्रपटावर त्यांची भूमिका ही महत्त्वाची आहे. अशातच ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चित्रपटातील सीनबद्दल भाष्य केलं आहे.
‘इट्स मज्जा’च्या मुलाखतीत त्यांनी असे म्हटले की, “संदीप रेड्डी वांगाने माझी दोन ते तीनच कामं पाहिली आहेत. पण त्याला असं वाटत होतं की, चित्रपटातील ‘फ्रेडी’ ही मराठी भूमिका उपेंद्रनेच करायला हवी. संदीप रेड्डी वांगाचा मराठी सहाय्यक दिग्दर्शक जितेंद्र भोसले होता. या भूमिकेसाठी तो मला सहा महिने संपर्क साधत होता. एक सीन आहे तो करणार का? असं तो मला सतत विचारत होता. पण मी त्याला नकार देत होतो. दरम्यान एकेदिवशी सहाय्यक दिग्दर्शकाने संदीपबरोबर माझी मीटिंग करुन दिली. तेव्हा मला त्यांनी या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी तयार केलं. यावेळी संदीपने मला माझ्या चित्रपटातील भूमिकेविषयी व सीनविषयी सांगितले. त्यामुळे बॉलिवूडच्या इतक्या मोठ्या सुपरहिट चित्रपटाचा मला भाग होता आलं, यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो. या भूमिकेसाठी उपेंद्र पाहिजे ही संदीपची मनापासून इच्छा होती.
यापुढे त्यांनी असे म्हटले की, “मी या चित्रपटासाठी दिग्दर्शकाच्या मागे लागलो नाही. टी सीरिजचा मोठा चित्रपट येत आहे. संदीप भाऊ मला चित्रपटामध्ये काम करायचंच आहे, मला कृपया भूमिका द्या असं मी फोन करुन बोललो नाही. असा माझा कोणताच स्ट्रगल नव्हता. हा चित्रपट मी नाकारत होतो. बऱ्याच जणांनी आता चित्रपटही पाहिला आहे. यातील माझी चड्डी काढली जाणार असल्याचे दिग्दर्शकाने सांगितले. तेव्हा मी म्हणालो, “चड्डी काढायला मला काही प्रॉब्लम नाही. पण घालणार कोण आहे?” यावर संदीप म्हणाला “रणबीर कपूर” यावर मीही रणबीर चड्डी काढणार असेल तरच मी चड्डी काढतो.” असं म्हटलं. कारण असे अनेक मुद्दे असतात. माझी बायको, मुलगा आहे त्यांना आपल्या कामाची लाज तर वाटणार नाही ना याचा सुद्धा विचार करावा लागतो. बाबा तू हे करायला नको होतं हे मुलांकडून यायला नको.”
दरम्यान, एका आर्मी ऑफिसरच्या मुख्य भूमिकेतून उपेंद्रने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. त्याचबरोबर त्याच्या ‘चांगभलं’ या डायलॉगने तो चित्रपटगृहातील प्रेक्षकांची दाद मिळवतो. त्यामुळे चित्रपटात अनिल कपूर, रणबीर कपूर, बॉबी देओलसारखे बॉलिवूडमधील मोठे स्टार्स असले तरी मराठमोळे उपेंद्र लिमये चांगलेच भाव खाऊन गेले आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.