सध्या ‘अॅनिमल’ चित्रपटाची क्रेझ सगळीकडे पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. १ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बरेच रेकॉर्ड मोडत नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. अभिनेता रणबीर कपूरची या चित्रपटातील भूमिका सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूरसह, बॉबी देओल, अनिल कपूर, अभिनेत्री रश्मिका मंदाना हे महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. या सगळ्या कलाकारांच्या यादीत मराठमोळ्या कलाकाराने आपल्या हटके अंदाजाने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. तो मराठमोळा कलाकार म्हणजे अभिनेता उपेंद्र लिमये. मध्यांतराच्या पूर्वी उपेंद्र यांची एंण्ट्री होते आणि चित्रपटगृहात नुसता टाळ्यांचा कडकडाट ऐकायला येतो. अशा या हटके अंदाजातील उपेंद्र यांना चाहत्यांनी अगदी डोक्यावर घेतलं आहे. नुकत्याच त्यांनी ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या एक मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा शेअर केला आहे. त्यात त्यांनी अभिनेता म्हणून स्वतःचे पाय जमिनीवर ठेवायला लावणारा त्यांच्या आयुष्यातील एक अनुभव शेअर केला. (upendra limaye shared the story of tea and spotboy)
उपेंद्र सेटवरील अनुभव सांगत म्हणाले, “आपण प्रत्येक व्यक्तीकडून नेहमी शिकत असतो. मग ते ज्येष्ठ कलाकार असो किंवा कनिष्ठ कलाकार अगदी आपल्याला स्पॉट बॉयकडूनही शिकता येतं. मी एक हिंदी चित्रपट करत होतो. माझ्याबरोबर माझा एक मुलगा नेहमी असतो. जो माझ्याबरोबर १५ – १६ वर्षे काम करत आहे. पण त्यादिवशी सुरेश नेमका माझ्याबरोबर नव्हता. त्यावेळी आम्ही बाहेर शूटला गेलो होतो. माझा शॉट संपला आणि मी स्पॉटदादाला म्हटलं, ‘मला चहा द्या’. त्यावेळी माझा ‘पेज ३’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे माझा अंदाजही थोडा बदलला होता. अगदी मस्ती येतेना तसं सगळं झालं होतं. मी म्हटलं स्पॉटदादा चहा द्या. तेव्हा नुकताच माझा अॅक्शन सीनही झाला होता त्यामुळे मी घामाघूम झालो होतो. मी सांगताच त्यांनी मला पटकन एका प्लॅस्टिकच्या कपात चहा आणून दिला. प्लॅस्टिकच्या कपातील चहा पाहता माझा अहंकार दुखावला गेला. कारण मी तेव्हा ‘पेज ३’ चित्रपट करून आलो होतो जो चांगला चालत होता. मी त्यांना म्हटलं प्लॅस्टिक कपात चहा देता. याउद्देशाने त्यांना ‘या मध्ये?’ असा प्रश्न केला”.
पुढे उपेंद्र सांगतात, “त्यावर उत्तर देत तो म्हणाला की, ‘मला असं वाटलं की तुम्हाला आता चहा ताबडतोब हवा आहे. तर माझ्याकडे आता एवढंच आहे ज्यातून मी तुम्हाला देऊ शकतो. यामुळेच मी तुम्हाला यातून चहा दिला. चहा निटनेटकेपणाने आणण्यासाठी मला तिकडे जावं लागेल. कपमधून, मग मधून थर्मासमधून चहा आणून मग तुम्हाला इथे आणून देण्यासाठी १५ मिनीटं जातील. त्यात तुमची चहाची मजा गेलेली असेल. म्हणून तुम्हाला असा चहा आणून दिला. सॉरी मी तुम्हाला पुन्हा १५ मिनीटांत चहा आणून देतो. असं करत तो कप माझ्याकडून घेणार तर त्याने जाता जाता मुस्काटात मारावी तसं मला एक वाक्य सांगितलं, ‘बऱ्याचदा बच्चन सर पण यातूनच चहा पितात’. हे ऐकताच मी त्याला तेव्हा म्हणालो की, ‘नको नको राहू दे मला पण आता लगेच चहा हवा आहे’. असं म्हणत म्हणून मी त्याच्याकडून घेऊन त्यातूनच चहा प्यायलो”, असं सांगत उपेंद्र यांनी त्यांच्या आयुष्यातील अभिनेता म्हणून शिकवणारा किस्सा शेअर केला.
उपेंद्र पुढे सांगतात, “मला हे सांगायचं आहे की गरजेचं नाही की अमिताभ बच्चनच तुम्हाला काहीतरी शिकवतील एक स्पॉटबॉयसुद्धा तुम्हाला काहीतरी शिकवून जातील. फक्त हे सगळं शिकायची तुमची स्वतःची सकारात्मक बदल करायची तयारी आपल्यात असणे गरजेचे आहे”, असं म्हणत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील तो प्रसंग शेअर केला आहे.