मराठीत विनोदी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींमध्ये विशाखा सुभेदार या अभिनेत्रीचे नाव हे अग्रगण्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विनोदी भूमिका साकारत तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. विशाखा ही एक उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच एक निर्मातीदेखील आहे. सध्या रंगभूमीवर गाजत असलेले ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकाची निर्मिती तिनेच केली आहे. या नाटकात प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, पंढरीनाथ कांबळेसह विशाखाने अभिनय केला आहे. त्याचबरोबर तिने या नाटकाची निर्मितीदेखील केली आहे. (Vishakha Subhedar Shared Post About Kurrr Play On Instagram)
लॉकडाउनच्या काळात सुरू झालेल्या या नाटकाने हळहळू प्रेक्षकांच्या मनात घर केले. अनेक पुरस्कारांनी हे नाटक गौरवण्यातदेखील आलं आहे. विनोदी बाज असलेल्या या नाटकातून एक सामाजिक संदेशदेखील देण्यात आला आहे. विशाखा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मिडियाद्वारे ती तिच्या दैनंदिन जीवनातील काही गोष्टी, तसेच नाटकाच्या काही अपडेट्स देत असते. अशातच तिने शेअर केलेल्या एक पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
विशाखाने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे नाटकाबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने आगामी काळात नाटकात होणाऱ्या बदलाविषयी संगितले आहे. यात पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “कुर्रर्रर्रर्र हे माझं, प्रग्यास (निर्मिती संस्था)चं पहिलं नाटक आहे. ४ डिसेंबरला या नाटकाचा शुभारंभ होऊन आता दोन वर्ष पूर्ण होतील! कोव्हिडसारख्या काळात धडपड करुन हे नाटक उभं केलं. या नाटकात प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, पंढरीनाथ कांबळे यांचीही साथ होतीच. पण आता त्यात काही बदल घडत आहेत. काहीही झालं तरी जोवर नाटक जगत आहे, तोवर जगवायचं हे निर्मिती संस्थेचं काम आहे आणि ते काम मी इमाने इतबारे करत राहणार. पुन्हा एकदा नवीन मोट बांधत आहे. नाटकात काही बदल होणार आहेत आणि हे बदल काय हे तुम्हाला लवकरच सांगेन. तोपर्यंत तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असंच राहू द्या.”
विषखाने तिच्या पोस्टमध्ये ‘नवीन मोट बांधत आहे आणि काही बदल होणार आहेत’ असं म्हटल्याने नाटकात नक्की काय बदल होणार? आणि कसले बदल होणार? याविषयी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, विशाखा सध्या स्टार प्रवाह वरील ‘शुभविवाह’ या मालिकेत नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तर आगामी काळात तिचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात ‘कुर्रर्रर्रर्र’ नाटका होणारे बदल यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.