मराठी नाटक, मालिका, चित्रपट यासारख्या माध्यमांत अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. अभिनयासह हृताने तिच्या मनमोहक सौंदर्यानेदेखील अनेकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. हृताच्या छोट्या पडदयावरील ‘दूर्वा’, ‘फुलपाखरू’, व ‘मन उडू उडू झालं’ या मालिका चांगल्याच गाजल्या. या प्रत्येक मालिकेमधील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.
मराठी मालिकांनंतर हृता मराठी चित्रपटसृष्टीकडे वळली. गेल्या काही काळात ती ‘टाइमपास ३’ ,’अनन्या’ व ‘सर्किट’ अशा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. मनोरंजन सृष्टीद्वारे तिला लोकप्रियता व प्रसिद्धी मिळाली असली तरी याच सिनेसृष्टीबाबत हृताला काही गोष्टी खटकत असल्याचे तिने याआधी म्हटले आहे. अशातच तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमुळे तिने या मुद्द्यावर पुन्हा एकदा रणशिंग फुंकले असल्याचे दिसत आहे.

हृता ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने असे म्हटले आहे की, “जे जे लोक माझं आयुष्य पाहतात आणि त्याबद्दल गॉसिप (चर्चा) करत असतात. त्यांनी अजिबात थांबू नका. कारण माझ्या आयुष्याचा दूसरा भागदेखील लवकरच तुमच्या भेटीला येत आहे.” असं म्हटलं आहे.
दरम्यान, हृताने या पोस्टद्वारे नेमका कुणावर निशाणा साधला आहे. या पोस्टद्वारे तिने नक्की कुणाला टोमणा मारला आहे हे कळत नाही आहे. पण हृताच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. या पोस्टमुळे तिने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.