आपल्या विनोदाच्या अनोख्या बाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले अभिनेते म्हणजे मकरंद अनासपुरे. नाटक, मालिका, चित्रपट व वेबसीरिज अशा अनेक माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाद्वारे त्यांनी चाहत्यांच्या मनात आपली एक वेगळी छाप उमटवली आहे. विनोदी भूमिकांसह गंभीर भूमिकाही तितक्याच ताकदीने निभावल्या आहेत. अभिनेत त्यांच्या खासगी आयुष्याविषयी क्वचितच व्यक्त होत असतात. अशातच मकरंद अनासपुरे यांनी नुकतेच एका मुलाखतीत त्यांच्या पत्नीविषयी भाष्य केले आहे.
मकरंद अनासपुरे यांनी नुकतीच ‘नवरदेव बीएससी एग्री’ चित्रपटाच्यानिमित्ताने ‘मित्रम्हणे लाइमलाइट’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या लग्नाबाबत भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले, “मी ‘जाऊबाई जोरात’ नाटक करत होतो. त्यादरम्यान मी चाळीमध्ये मित्राकडे राहत होतो. तेव्हा संघर्षाचा काळ होता. तिच पँट मी बऱ्याचदा घालून नाटकासाठी जात होतो. आठ बायका आणि आठ मुली असलेलं हे नाटक होतं. त्या नाटकामध्ये माझी सध्याची जी बायको आहे तीही काम करत होती.”
“ती तिच्या मैत्रिणीकडे नेहमी बोलत असायची की, हा कसा आहे तेच तेच कपडे घालून येतो. तेच तेच कपडे घालायला त्याला काही वाटत नाही का? असं ती सतत म्हणायची. तिची मैत्रिण एक दिवस त्याला म्हणाली की, तुला असं वाटत नाही का? सतत तू त्याच्याबद्दलच बोलत आहेस. तू त्याच्या प्रेमामध्ये पडली आहेस का?. यामधूनच आमच्या नात्याला सुरुवात झाली”.
“जेव्हा तिच्याकडून मला लग्नाची मागणी आली तेव्हा मी होकार दिला. लग्नासाठी आपल्याला कोणी विचारत आहे याच्यापेक्षा अधिक कौतुकाचं काय असू शकतं असं त्यावेळी माझी अवस्था होती. माझं शहरात काहीच नव्हतं. आता तरी मी खात्या-पित्या घरचा वाटतो. तेव्हा फक्त पित्याच घरचा दिसत होतो. तरीपण तिने माझ्यावर विश्वास ठेवला. लग्नानंतर आता सासरवाडीमध्येही पटलं आहे की, अभिनेता नवरा असला तरी एवढं काही वाईट नसतं”. लग्नाबाबत आणि पत्नीविषयी मकरंद यांनी अगदी दिलखुलासपणे भाष्य केलं.