मालिकाविश्वात सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. रंजक वळणावर सुरु असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं आहे. मालिकेत सध्या एकामागोमाग एक आलेले ट्विस्ट पाहता मालिकेचा प्रेक्षकवर्गही आश्चर्यचकित झाला आहे. आशुतोषच्या मृत्यूने अरुंधतीवर ओढावलेलं संकट यातून तिला होणारा त्रास हे सारं पाहायला मिळत आहे. मात्र आता हा मालिकेचा नवा प्रवास मालिकेच्या नव्या वेळेत सुरु झाला आहे. दररोज सायंकाळी साडेसात वाजता लागणारी ही मालिका दुपारी अडीच वाजता दाखविण्यात येत आहे. (Milind Gawali On Aai Kuthe Kay Karte serial)
मालिकेची वेळ बदलल्याने प्रेक्षकवर्ग कमी होईल का?, मालिका पाहतील का? असे अनेक प्रश्न असतानाही केवळ मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना जोडून ठेवलं आहे. यावरुन मालिकेतील कलाकार अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी यांनी शेअर केलेल्या पोस्टने सार्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मिलिंद गवळी यांनी ही पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “‘आई कुठे काय करते’ आता सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता. जवळजवळ सव्वाचार वर्ष आमची ही मालिका संध्याकाळी साडेसात वाजता यायची. ही मालिका इतकी लोकप्रिय होती की, संध्याकाळी साडेसात वाजता असंख्य घरांमध्ये ‘स्टार प्रवाह’ चॅनल सुरु असायचं. या चार वर्षात मी असंख्य लोकांना, कुटुंबांना भेटलो सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की, आमच्याकडे ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आवर्जून बघितली जाते, त्यावेळेला कुणीही दुसरं चॅनल लावत नाही, आयपीएल असलं तरी सुद्धा साडेसात वाजता ही मालिका बघितली जायची”.
पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “आता १८ मार्चपासून निर्णय घेण्यात आला की आमची ही मालिका संध्याकाळी साडेसातच्या ऐवजी दुपारी अडीच वाजता दाखवण्यात येईल. संध्याकाळची बघितली जाणारी मालिका दुपारी बघितली जाईल का? असा एक मनामध्ये प्रश्न येत होता, पण आता दोन आठवडे झाले आणि मी ज्या ज्या लोकांना भेटतोय, त्यातल्या बऱ्याचशा बायका मला सांगतात की ‘आम्ही आता दुपारी मालिका बघायला सुरुवात केली आहे बर का’. मला ऐकून छान वाटलं. आणि माझ्या असं ही ऐकण्यात आलं आहे की दुपारच्या वेळेचा टीआरपी पण अतिशय चांगला आहे”.
पुढे ते असंही म्हणाले आहेत की, “मला असं वाटतंय ज्यांना ज्यांना ही मालिका आवडते आणि जे आवर्जून ही मालिका बघतात, त्यांच्यासाठी वेळेचं काही बंधन नाही, संध्याकाळ असो दुपार असो किंवा मग हॉटस्टारवर बघणारे ही मालिका आवडीने बघतात. मला खरंच ‘स्टार प्रवाह’चं ,राजनशाहींचं, नमिताचं, सतीश राजवाडे यांचं, दिग्दर्शकांच्या टीमचं, क्रिएटिव्ह टीमचं, माझ्या सहकलाकारांचं, पूर्ण युनिटचं कौतुक करावसं वाटतं ज्यांनी कायम उत्तम काम करायची सातत्यता, सर्जनशील विचार, चिकाटी दाखविली”.
मालिकेबाबत बोलताना त्यांनी असंही म्हटलं की, “बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की ही मालिका खूप चालली आहे, आता अजून पुढे हे काय दाखवणार आहेत ? पण या मालिकेचा कलाकार म्हणून प्रत्येक वेळेला माझ्या हातात जेव्हा स्क्रिप्ट येते, स्क्रीन प्ले येतो, माझी स्वतःची काम करायची उत्सुकता वाढत जाते. आणि माणसांच्या आयुष्यावर आधारलेली गोष्ट, ही इतक्या लवकर कशी संपू शकेल, जसं आपल्या सगळ्यांचे आयुष्यामध्ये सतत काही ना काहीतरी घडत असतं, तसंच या देशमुख कुटुंबामध्ये मनोरंजक घडणारी गोष्ट आपली उत्कंठा आणि उत्सुकता वाढवत असतं. आजही मला भूमिका करताना तेवढीच मजा येते आहे. बरं इथे बाहेर अतिशय ऊन वाढलेलं आहे. ३७\३८ डिग्री आहे, तुमच्या इथे ऊन वाढलं असेल तर, तुम्ही पण सगळे काळजी घ्या, भरपूर पाणी पीत जा, शक्यतो उन्हात जाऊ नका, अडीच वाजता ‘स्टार प्रवाह’वर ‘आई कुठे काय करते’ बघा”.