बरेच कलाकार हे प्राणीप्रेमी असलेले आपल्याला पाहायला मिळतात. कलाकार त्याच्या पाळीव प्राण्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर करत असतात. या प्राणीप्रेमी कलाकारांच्या यादीत एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जाईल ते म्हणजे प्रार्थना बेहरे. प्रार्थनाचं प्राणिप्रेम आपण नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन पाहत असतो. सोशल मीडियावर नेहमीच ती तिच्या पाळीव प्राण्यांबरोबरचे व्हिडीओ, फोटो शूट करुन पोस्ट करताना दिसते. अशातच प्रार्थनाने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Prarthana Behere Troll)
प्रार्थनाने आजवर अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनयाशिवाय अभिनेत्रीने तिच्या सौंदर्याने साऱ्या चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. प्रार्थनाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रार्थना तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावरही अभिनेत्रीचा बऱ्यापैकी वावर असलेला पाहायला मिळतो. प्रार्थना अनेकदा ट्रेंडिंग रील व्हिडीओ बनवूनही शेअर करताना दिसते. अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका व्हिडीओची सध्या चर्चा सुरु आहे.
“एक आई असणे”, असं कॅप्शन देत प्रार्थनाने जेवण बनवतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये जेवण बनवता बनवता बाळाचा रडण्याचा आवाज येतो, आणि प्रार्थनाच जेवणाकडून दुर्लक्ष होतं. मात्र रडण्याचा आवाज येणार बाळ म्हणजे तिचा पाळीव श्वान असतो. लगेचच ती त्या पाळीव श्वानाला उचलून घेते. या व्हिडीओखली कॅप्शनमध्ये तिने हे जेवण ती तिच्या पाळीव प्राण्यासाठी बनवत असल्याचं ही म्हटलं आहे.
सदर व्हिडीओ पाहून, नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ट्रोल केलेलं पाहायला मिळत आहे. पाळीव प्राण्याला हात लावून त्याच हाताने जेवण बनवल्याने प्रार्थना ट्रोल झाली आहे. “मुलं व्हायच्या वयात कुत्री खेळवतात”, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर काहींनी, “कुत्र्याचे केस लागले बघ हाताला”, “कुत्र्याचे केस हाताला लागले आणि तेच हात”, “कुत्र्याबरोबर स्वयंपाक करणे इतके अस्वच्छ, हात धुतले नाही”, “कुत्र्याला टाकशील कालवणात”, असं म्हणत अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे.