गायक प्रथमेश लघाटे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमुळे प्रथमेशला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. याशिवाय प्रथमेश त्याच्या व मुग्धाच्या लग्नसोहळ्यामुळे विशेष चर्चेत आला. सोशल मीडियावर बऱ्यापैकी चर्चेत असणाऱ्या या जोडीचं नेहमीच कौतुक होताना दिसतं. अशातच प्रथमेशने पुन्हा सुरु केलेल्या व्यवसायाची माहिती त्याने सोशल मीडिया पोस्टवरुन दिली आहे. प्रथमेशने हा नवा व्यवसाय पुन्हा सुरू केल्याचं म्हटलं आहे. (Prathamesh Laghate Answers To Trollers)
प्रथमेश न हा मूळचा कोकणचा असल्याने प्रथमेशने यंदाच्या आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचा व्यवसाय सुरू केला असल्याचं समजत आहे. यापूर्वीही प्रथमेशने हा व्यवसाय सुरू केला होता. प्रत्येक सीजनला तो या व्यवसायाबद्दलची माहिती शेअर करत अपडेट देत असतो. सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत, “नमस्कार! २०२४च्या आंब्याच्या सिझनमध्ये तुमचं स्वागत आहे. आंबाप्रेमींच्या सेवेत आत्तापासून पुन्हा रुजू होत आहोत. तीच चव, अव्वल दर्जा, तसाच गोडवा. गुढीपाडव्यासाठी लघाटे आंबेवाले यांच्याकडे आपली ऑर्डर त्वरित बुक करा आणि नववर्षाच्या स्वागताची दिमाखदार परंपरा अबाधित ठेवा”, त्याने असं म्हटलं आहे.
प्रथमेशने ही पोस्ट शेअर करताच अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत मराठी माणूस व्यवसायात उतरल्यामुळे त्याचं कौतुक केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र प्रथमेशच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने केलेल्या कमेंटने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. प्रथमेशने केलेल्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने केलेल्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. दरम्यान प्रथमेशच्या पोस्टवर नकारात्मक कमेंट करणाऱ्या या नेटकऱ्याला त्याने चांगलंच सुनावलं आहे.
या नेटकऱ्याने, “शेतकऱ्यांकडून घेऊ, तुमच्या कडून कधीच नाही”, अशी कमेंट केली आहे. यावर उत्तर देत, “कुठूनही घ्या हो.. पण आंबा खा आणि थंड व्हा”, असं प्रथमेश म्हणाला. मात्र नेटकरी यावर शांत न राहता परत उत्तर करत म्हणाला, “कुठून ही नाही शेतकऱ्यांकडून, त्यामुळेच तुमच्या कडून नाही”, असं म्हणाला. हे वाचून प्रथमेशने सणसणीत उत्तर दिलेलं पाहायला मिळतंय. “कुठूनही म्हणजेच कोणत्याही शेतकऱ्याकडून. माझी भाषा तुम्हाला समजायला खूपच अवघड जाते आहे असं दिसतंय. तुमचं नाव तर विवेक दिसतंय पण प्रत्यक्षात सद् सद् विवेक मात्र आजारी आहे. त्यात स्वतःची खरी ओळख लपवावी लागते इन्स्टावर फॉलोवर्सही शून्य. त्यामुळे नकाच घेऊ तुम्ही आमच्याकडून आंबे. कारण स्वतःची ओळख लपवणाऱ्यांनी एखाद्या बरी ओळख असणाऱ्याकडून आंबे घेणं शोभत नाही आण्णा”, असं म्हणत चांगलंच सुनावलं.
प्रथमेशने दिलेल्या उत्तराला त्या नेटकऱ्याने पुन्हा प्रतिउत्तर देत असं म्हटलं की, “तुम्हाला आंबे विकायची पाळी आली यावरुन कळतंय तुमची किती ओळख आहे. माझे इन्कम ऐकून रात्री झोप येणार नाही तुम्हाला. आणि हो, आंबे शेतकऱ्यांकडूनच घेणार मधले चिल्लर मार्जिन मारणाऱ्याकडून नाही”, असं म्हणत टोकलं. यावर पुन्हा प्रथमेशने उत्तर देत, “स्वतःहूनच स्वतःला ग्रेट म्हणण्यापेक्षा आंबे विकलेले बरे. एवढं इनकम असूनही फॉलोवर्स शून्यच??”, असं म्हटलं.