‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच सर्वांना या चित्रपटाची उत्सुकता लागली होती. ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी आता यात चित्रपटाच्या ट्रेलरचीही भर पडली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील विनोदवीर प्रसाद खांडेकरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कलाकारांची भलीमोठी फौज या चित्रपटात आहे. (Ekda Yeun Tar Bagha Movie Trailer Realesed)
या चित्रपटात एक-दोन नव्हे तर तब्बल १५ कलाकारांची फौज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे साहजिकच ती धमाल ट्रेलरमध्येही पाहायला मिळत आहे. सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, पंढरीनाथ कांबळे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने, राजेंद्र शिसतकर, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार आदि कलाकारांच्या अभिनयाने हा चित्रपट सजला आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये फुलंब्रीकर नावाचं एक अतरंगी कुटुंब पहायला मिळत आहे. गाव पर्यटनस्थळ म्हणून घोषित झाल्यानंतर फुलंब्रीकर कुटुंब एका वाड्यात ‘एकदा येऊन तर बघा’ या नावानं हॉटेल सुर करतात. या हॉटेलमध्ये आलेल्या पहिल्याच माणसाचा (ग्राहकाचा) अचानक मृत्यू होतो आणि पुढे अनेक गोष्टी घडत जातात. या पहिल्या ग्राहकाचा मृत्यू आणि त्यानंतर घडणाऱ्या एकेक गोष्टीसाठी फुलंब्रीकर कुटुंबाची होणारी दमछाक त्याचबरोबर या सगळ्यात होणारा हास्यधुमाकूळ… असं बरंच काही या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – “भर कार्यक्रमात शाहिद कपूर स्टेजवर कोसळला अन्…”, व्हायरल व्हिडीओची होत आहे चर्चा, पाहा नेमकं काय घडलं
दरम्यान हा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. प्रेक्षकांना हा ट्रेलर चांगलाच पसंत पडल्याचं पाहायला मिळत आहे. या ट्रेलरवर प्रेक्षकांनी लाईक्स व कमेंट्स करत त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे. येत्या ८ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.