बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो डान्स करताना खाली पडताना दिसत आहे. गोव्यात सोमवारी ५४व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या दिवशी माधुरी दीक्षितपासून शाहिद कपूरपर्यंत सर्वांनीच आपल्या नेत्रदीपक नृत्याने सर्वांची मनं जिंकली. यानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावरून समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शाहिद स्टेजवर परफॉर्म करताना खाली पडला असल्याचं दिसत आहे. (Shahid Kapoor Viral Video)
ट्विटरवर एक व्हिडिओ क्लिप शेअर करण्यात आली आहे, यांत शाहिद कपूरने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे आणि तो स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. त्याच्यासह स्टेजवर त्याचा डान्स ग्रुपही परफॉर्म करत होता. डान्स करत असताना तो मागे वळताच अचानक खाली पडला. मात्र, शाहिदने लगेच स्वतःला सावरत उठून पुन्हा तेवढ्याच एनर्जीने डान्स केला.
डान्स झाल्यानंतर शाहिदने तो जिथे पडला होता त्याजागी नेमका तो कसा पडला, याची त्याने तपासणी केली. त्याच्या या कृत्यावर त्याला स्वतःलाच हसू आलं. त्यानंतर परतताना त्याने त्याच्या चाहत्यांना फ्लाईंग किस दिली. दरम्यान उपस्थित मंडळींनी शाहिदला प्रोत्साहन दिलं आणि त्याचा डान्स एन्जॉय ही केला.
शाहिदने त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कबीर सिंग’ मधील प्रसिद्ध ‘वाना वाह वाह बीजीएम’ मध्ये बाइक चालवत कार्यक्रमात प्रवेश केला. ‘मौजा ही मौजा’ ते ‘धटिंग नाच’ या गाण्यांवर ठेका धरत उपस्थितांची मनं जिंकली. स्टेजवर परफॉर्म करण्यापूर्वी शाहिदचा रेड कार्पेट लूक विशेष चर्चेत ठरला. आजवर शाहिदने त्याच्या अभिनयाने, नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्याच्या गोव्यात सुरु असणाऱ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवातील नृत्याचंही सर्वत्र कौतुक होत आहे.