अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने नेहमीच त्याच्या अभिनयशैलीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आजवर संकर्षनने त्याच्या अभिनयशैलीच्या जोरावर स्वतःचा असा हक्काचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. नेहमीच तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसमोर व्यक्त होताना दिसतो. बरेचदा नाटकाच्या दौऱ्यानिमित्त आलेले खास अनुभव तो शेअर करतो. चाहतेही त्याच्या या अनुभवांवर प्रतिक्रिया देत त्याला प्रतिसाद देत असतात. अशातच
संकर्षणने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सांगली येथील नाटकाच्या दौऱ्यानिमित्त संकर्षणने त्याला आलेला दैवी अनुभव शेअर केला आहे. (Sankarshan Karhade Post)
संकर्षणने सांगलीतील नाटकाच्या प्रयोगानंतर कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. मंदिराबाहेरील एक फोटो शेअर करत त्याने हा दैवी अनुभव चाहत्यांसह शेअर करत म्हटलं आहे की, “सुप्रभात आज पहाटे २.३० पासुनचा अनुभव. कार्तिक मासामध्ये महालक्ष्मी देवीच्या ‘अंबाबाई’च्या नित्योपचारात बदल होतो. पहाटे २.३० वा. मंदिर उघडते आणि काकडा सुरू होतो. मशाल घेउन देवीच्या कळसापासून कापूर लावण्यास सुरवात होते ते गाभाऱ्यातल्या जवळपास १५० मंदिरांच्या ठिकाणी कापूर प्रज्वलित केला जातो”.
पुढे संकर्षणने लिहिलं आहे की, “पहाटे ३-३.३० च्या दरम्यान सगळा परिसर कापूराच्या ज्योतीने ऊजळेला पाहून काय प्रसन्न वाटत होतं. त्यात हे सगळं सनईच्या गोड आवाजात. हे करता करता देवीसमोरचं दार म्हणजे मुख्य गर्भगृह उघडलं जातं आणि देवीला “ऊठ ऊठ माते अरुणोदय झाला” अशी साद घालत जागं केलं जातं. देवीची काकडा आरती केली जाते”.
या भेटीचा अनुभव शेअर करत संकर्षण म्हणाला की, “काल सांगलीचा रात्रीचा प्रयोग करून मी पहाटे २.३० वाजता मंदिरात आलो हा सगळा सोहळा मला पहिल्यांदाच पहाता आला, अनुभवता आला आणि तुम्हाला सांगतो देवीच्या पायवर डोकं ठेउन दर्शन घेता आलं, काय सांगावं कसं वाटलं. माझे डोळे सतत भरून येत होते. मनांत काय भाव आले हे सांगताच येणार नाही, असा हा अनुभव होता. कालचा सांगलीचा प्रयोग जोरदार झाला”, असं म्हणत संकर्षणने अनुभवाचं मोजक्या शब्दांत खूप छान असं वर्णन केलं. त्याच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.