सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून जिची गणना आजही केली जाते त्या ड्रीम गर्ल हेमा मालिनी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. आजही त्यांचे लाखो चाहते दिवाने आहेत. हेमा मालिनी यांनी एक काळ विशेष गाजवला होता. तेव्हापासून त्यांनी स्वतःचा असा वेगळा चाहतावर्ग तयार केला आहे. हेमा मालिनी यांच्या अभिनयासह त्यांच्या सौंदर्यावरही चाहते फिदा आहेत. आजही त्यांचा सौंदर्याचं कौतुक होताना दिसतं. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने त्यांच्यासाठी केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Rupali Bhosale On Hema Malini)
मालिकाविश्वात सध्या आघाडीवर असलेली मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. आजवर रुपालीने तिच्या अभिनयाने व सौंदर्यांने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे रुपालीला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. याशिवाय रुपालीने तिच्या नृत्याने अनेकांच्या मनात घर केलं. रुपालीचे जसे लाखो चाहते आहेत तशीच रुपालीही एका दिग्गज बॉलिवूड अभिनेत्रीची चाहती आहे. रुपाली अभिनेत्री हेमा मालिनी यांची चाहती आहे. तिने हेमा मालिनीच्या भेटीदरम्यानचा एक फोटो शेअर करत एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्रीने हेमा मालिनी यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. “ड्रीम गर्ल. अरे देवा. मी तिच्या कृपेने व सौंदर्याने आश्चर्यचकित झाले. तिला लाइव्ह परफॉर्म करताना पाहणे दैवी व आनंददायी होते. आणि मी तिच्यासमोर सादरीकरण करणे हा एक अद्भुत अनुभव होता. जेव्हा मी तिला भेटले तेव्हा ती म्हणाली, “तू सुंदर आहेस आणि तू खूप सुंदर अभिनय केलास”. तिच्या या कौतुकाने माझा दिवस देवीचा आशीर्वाद मिळाल्यासारखा सुंदर गेला. धन्यवाद हेमा मॅम. माझं केलेल्या कौतुकाची व मला दिलेल्या आशीर्वादासाठी धन्यवाद. खूप प्रेम मॅम” असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.
रुपालीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. काही अभिनेत्यांनीही रुपालीचं कौतुक केलं आहे.