‘आई कुठे काय करते?’ मालिकेतील अनिरुद्ध हे पात्र घराघरांत पोहोचवणारे अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. मालिकेत त्यांची नकारात्मक भूमिका असली तरी प्रेक्षकांकडून त्यांच्या भूमिकेला चांगलीच पसंती मिळत आहे. सोशल मीडियावरही ते बऱ्यापैकी सक्रिय असतात. त्यांच्या खासगी आयुष्यातील काही घटना, किस्से वा अनुभव ते सोशल मीडियाद्वारे नेहमीच शेअर करत असतात. अशातच आता त्यांनी शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. (Actor Milind Gawali Shared Video On Instagram)
मिलिंद यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी लोहगड किल्ला सर केल्याचा अनुभव चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी असं म्हटलं आहे की, “परवा लोहगड हा किल्ला चढायचा योग आला. खूप छान वाटलं, आपल्याला गड चढता येतो याचं एक वेगळं समाधान असतं, उंच डोंगर चढणं काय साधी गोष्ट नसते, आपण जेव्हा गड चढतो तेव्हा आपल्याला धाप लागत असते, काही लोक थांबत थांबत चढतात, तर काहींचा स्टॅमिना चांगला असतो त्यामुळे ते एका दमात तो गड चढायचा प्रयत्न करतात. दररोज व्यायाम म्हणून गड चढणारे लोक पण आहेत. एकदा का आपण गडावर पोचलो की एक वेगळं समाधान मिळतं, वेगळीच शांती मिळते. माझ्याबरोबर “Zen” आमचा कुत्रा होता, तो एका दमात वरती धावत सुटला. त्याचा स्टॅमिना बघून मला त्याचा हेवा वाटला, असं वाटलं की आपल्यामध्ये सुद्धा अशी ताकद असायला हवी”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “वरती पोहोचल्यावर डोक्यामध्ये असंख्य विचार येत होते, ते विचार असे होते की जर शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना शिकवायचा असेल तर तो वर्गामध्ये बसून न शिकवता जर आपण गडावरच मुलांना घेऊन गेलो आणि तिथे त्यांना इतिहास शिकवला तर तो त्यांच्या कायमस्वरूपी मनामध्ये घर करून बसेल आणि महाराजांचे विचार त्यांच्यापर्यंत खूप छान पद्धतीने पोहोचतील. जसं रवींद्रनाथ टागोरांनी ‘शांतिनिकेतन’ची स्थापना करून एक वेगळी शिक्षणपद्धती तयार केली तशीच आपण का नाही तयार करू शकत? छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, राजमाची, विसापूर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, चंद्रगड, सुरगड, घोसाळगड, कडासरी, रायगड, तोरणा, राजगड, सिंहगड आणि विशाळगड आदि गडांवर/किल्ल्यांवर जर मुलांसाठी शाळा सुरू केल्या आणि तिथे त्यांना इतिहास शिकवला, तर मला नाही वाटत की या जन्मात ती मुलं कधी आपला महान इतिहास विसरतील.”
आणखी वाचा – भारताच्या पराभवानंतर विराट कोहलीची झाली अशी अवस्था, अनुष्काने स्टेडियममध्येच मिठी मारली अन्…
तसेच यापुढे त्यांनी “आत्ताच्या आळशी इंटरनेट शिक्षण पद्धतीतून मुलांना बाहेर काढायचे असेल तर त्यांना गड चढायला लावणे आणि गडावर इतिहास शिकवणे हा एक छान पर्याय मला सुचतो आहे.” असं मत मांडलं आहे. दरम्यान त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांकडून लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर त्यांनी सुचवलेल्या शिक्षणपद्धतीमुळे देखील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.