सध्या मराठी कलाविश्वातील बरीच कलाकार मंडळी नवं घर, नवी गाडी घेत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर करताना दिसत आहेत. अशातच आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने नवी घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. ही अभिनेत्री म्हणजे शिवाली परब. शिवालीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. शिवालीने नवीन घर घेतलं असून तिच्या वाढदिवसादिवशी तिने सहकुटुंब या नव्या घरात प्रवेश केला आहे. अभिनेत्रीने याबाबतची एक खास पोस्ट नुकतीच सोशल मीडियावरून शेअर केली आहे. (Shivali Parabh New Home)
या पोस्टमध्ये शिवालीच्या नव्या घराची झलक पाहायला मिळत आहे. शिवालीने पोस्ट लिहित असं म्हटलं की, “१० मे २०२४. नमस्कार पहिले तर सगळ्यांना खूप-खूप धन्यवाद. माझ्या वाढदिवसानिमित्त कॉल्स, मॅसेज करून शुभेच्छा दिल्या. असाच तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद राहू दे आणि या आशीर्वादामुळे मी अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिनी माझ्या आई बाबांसाठी स्वतचं, हक्काचं एक घर घेतलं. काल गृहप्रवेश ही झाला, आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं जे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं म्हणजे स्वःतच एक घर. खरंतर हे घर माझं स्वप्न नाही माझ्या आई- बाबांच स्वप्न आहे आणि त्यांचे ऋण कधीच फेडले जात नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या आई-बाबांसाठी हे छोटंसं गिफ्ट”.
पुढे तिने लिहिलं की, “इतके वर्ष भाड्याच्या घरात राहिलो. हा प्रवास चाळीतून थेट मोठ्या बिल्डिंगच्या 2bhk अपार्टमेंटपर्यंतचा होता. प्रवास खूप गोड होता, शिकण्यासारखा होता. सगळ्यांचे खूप आभार. माझ्याबरोबर तुमच्या शुभेच्छा व सदिच्छा कायम असुद्या. हा व्हिडीओ यासाठी टाकत आहे कारण आई-बाबांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद कायम माझ्या स्मरणात रहावा. व्हिडीओ पोस्ट करताना मन भरुन आले आहे. काहीतरी मिळवल्याचा हा आनंद कमालीचा आहे. सगळ्यांचे खूप आभार”.
शिवालीच्या आई-बाबांनी या नव्या घरात गृह्प्रवेशाची पूजा केली. यावेळी शिवलीच्या जवळचे कुटुंबीयही उपस्थित होते. नव्या घराबाहेरील आकर्षक अशा नावाच्या पाटीने साऱ्यांचं लक्ष वेधलं. शिवालीबरोबर तिचे आई-वडील व बहिणीचा एकत्र फोटो घराबाहेर लावलेला पाहायला मिळाला. शिवालीच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी व कलाकार मंडळींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.