अगदी कमी वेळात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे सोशल मीडिया. सामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटीमंडळीं पर्यंत सगळ्यांनाच सोशल मीडियाचं वेड लागलं आहे. चाहत्यांपर्यंत पोहोचण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी कलाकार सध्या इन्स्टाग्राम, फेसबुकचा अधिकाधिक वापर करतात. पण बऱ्याचदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अभिनेत्री अश्विनी महांगडेही याला अपवाद नाही. अश्विनीने गणेशोत्सवानिमित्त एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.
कलाकार मंडळी कशाप्रकारचे कपडे परिधान करतात याबाबत सतत बोललं जातं. कपड्यांवरुन अभिनेत्रींना ट्रोल करणं काही नवी गोष्ट नाही. अश्विनीलाही एका चाहत्याने तिने परिधान केलेल्या कपड्यांवरुन एक सल्ला दिला. यावर तिने या चाहत्याला उत्तर दिलं. अश्विनी कामामधून वेळ काढत गणपती दर्शन करत आहे. तिने काही दिवसांपूर्वी श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांला भेट दिली.
आणखी वाचा – टीव्ही अभिनेता करण कुंद्राने मुंबईमध्ये समुद्रकिनारी खरेदी केले आलिशान घर, किंमत आहे तब्बल इतके कोटी
गणपती बाप्पासमोर हात जोडत अश्विनीने म्हटलं की, “श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुणे, मानाचा पहिला गणपती”. व्हिडीओमध्ये अश्विनी पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्या ब्लाऊजने विशेष लक्ष वेधून घेतलं. तिच्या ब्लाऊजच्या पाठच्या बाजूला गणपती बाप्पाची डिझाइन आहे. ते पाहूनच अश्विनीला एका चाहतीने सल्ला दिला.
चाहतीने म्हटलं की, “पाठिवर, पदरावर गणपती नसावा असं मला मनापासून वाटतं. शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तुम्हाला खूप जणं फॉलो करतात. आदर्श मानतात. मीही त्यातीलच एक आहे. त्या अधिकाराने ही कमेंट करत आहे राग नसावा. जे वाटलं ते लिहिलं. तुम्हाला शुभेच्छा”. यावर अश्विनीने “पुढच्या वेळी नक्की याकडे लक्ष देईन” असं म्हटलं. चाहतीने दिलेला सल्ला सकारात्मक रित्या घेत अश्विनीने पुन्हा एकदा सगळ्यांची मनं जिंकली.