कठोर, बेधडक व्यक्तिमत्व असलेल्या अभिनेत्याच्या यादीत एक नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेते नाना पाटेकर. मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूड सिनेसृष्टीत आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. आजवर नानांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नाना पाटेकर व अशोक सराफ यांचं खास बॉण्डिंग असल्याचं नेहमीच पाहायला मिळतं. त्यांच्या मैत्रीचं अनेकदा उदाहरणही दिलं जातं. अशातच नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघांमधील व्यवहाराचा एक किस्सा सांगितला आहे. (Nana Patekar On Ashok Saraf)
नाना यावेळी किस्सा सांगताना असं म्हणत आहेत की, “अशोक सराफ हा त्याकाळी टॉपचा स्टार होता. ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकांत आम्ही काम करायचो तेव्हा अशोक सराफला एका शोचे २५० रुपये मिळायचे आणि मला ५० रुपये मिळायचे. नाटकांत मधल्या वेळात आम्ही पत्ते खेळायचो. आणि तो मुद्दाम १०,१५ रुपये माझ्याकडे हरायचा आणि मी ते मुद्दाम घ्यायचो. मला कळायचं की तो मुद्दाम हरत आहे. पण तेव्हा गरज होती म्हणून मी घ्यायचो. अशोकने अशी खूप मदत केली”.
पुढे ते म्हणाले, “गणपतीच्या वेळेला पैसे नसताना एकेदिवशी सकाळी सहा वाजता फिल्मसिटीला तो जात होता. त्यावेळी तो माझ्याकडे आला आणि मी तेव्हा झोपलो होतो. “हा चेक घे आणि बँकेत १५ हजार आहेत तुला पाहिजे तेवढी रक्कम घाल”, असं तो म्हणाला. ही सत्तरची गोष्ट आहे. मी त्या चेकवर तीन हजार रुपये काढले. त्यानंतर हे पैसे खूप वर्ष मला परत करता आले नाहीत. त्यानंतर मी, कुलदीप पवार, अशोक, रंजना आम्ही ‘सावित्री’ नावाचा चित्रपट करत होतो. त्यावेळी मला एकदम पैसे मिळाले”.
“तेव्हा मी ते पैसे घेऊन त्याच्याकडे गेलो. तेव्हा तो मला म्हणाला, काय पाटेकर तुम्ही तर पैसेवाले झाले. तेव्हा मी म्हटलं, “अरे अशोक पैसेच परत करतोय वेळ परत नाही करु शकत”, असं मी म्हणालो.