आज ८ मार्च, जागतिक महिला दिन. संपूर्ण देशभरात महिला दिनानिमित्ताने स्त्री शक्ती जागर केला जात आहे. या खास दिनानिमित्त प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला शुभेच्छा देत त्यांना धन्यवाद म्हणत आहे. तसेच जीवनातील प्रत्येक स्त्रीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे. अनेक मराठी कलाकारांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच अभिनेत्री अमृता खानविलकरनेही महिला दिनाचे औचित्य साधत तिच्या आयुष्यातील खास स्त्रियांसाठी खास पोस्ट शेअर केल्या आहेत.
अमृता खानविलकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत तिच्या आयुष्यातील स्त्रियांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि तिच्या आयुष्यातील खास स्त्रिया म्हणजे मंजिरी ओक, सोनाली खरे व अभिनेत्रीची आई. अमृताने या प्रत्येकीचा फोटो पोस्ट करत त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी अमृताने मंजिरी ओकबरोबरचा फोटो पोस्ट करत “भावनिक, खंबीर, आत्मविश्वासू, लहान मुलांप्रमाणे वागणारी, उत्तम गृहिणी म्हणजे मंजिरी ओक ही माझ्या आयुष्यातील सर्वात उत्तम स्त्री आहे” असं म्हटलं आहे.

यापुढे अमृताने अभिनेत्री व तिची खास मैत्रीण सोनाली खरेबद्दल तिच्या भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “माझ्या हृदयाचाच एक भाग, विनोदी, सुंदर, उत्तम आई, धाडसी, संवेदनशील म्हणजे सोनाली खरे.” यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यातील आवडती व प्रिय स्त्री म्हणजे आई. आईबरोबरचा एक खास फोटो पोस्ट करत अमृताने असं म्हटलं आहे की, “आज मी जी कुणी आहे ते माझ्या आईमुळे आहे आणि माझ्यासाठी संपूर्ण जग असणारी माझी आई ही माझ्या आयुष्यातील आवडती स्त्री आहे.”


यासह अमृताने तिच्या आणखी काही मैत्रिणींबरोबरचे फोटो शेअर करत त्यांनाही ‘महिला दिना’निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, आज महिला दिनानिमित्त अनेकांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या आयुष्यातील स्त्रीला महिला दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.